छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या अर्थसंकल्पात तरुणी व महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. याशिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, पिंक रिक्षा, मुलींना व्यावसायिक शिक्षण १०० टक्के माफ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबद्दल महिलांनी आनंद व्यक्त केला. पण, या योजनांची अंमलबजावणी कधी होईल, याची शंकाही व्यक्त करण्यात आली. खात्यात दीड हजार रुपये देण्यापेक्षा महागाई कमी करा, सर्व महिला आनंदीत होतील, अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.
महागाई कमी कराराज्याचा अर्थसंकल्प बघितला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर करण्यात आली. याद्वारे महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होतील. अशी रक्कम बँक खात्यात देऊन महिलांना मिंधे करू नका. त्याऐवजी महागाई कमी करा, सर्व महिलांना फायदा होईल.-ममता कवाडे, सामाजिक कार्यकर्त्या
सिलिंडरच्या किमती कमी केल्या तर सर्वांना फायदातीन सिलिंडर मोफत ही योजना काही पात्र कुटुंबांसाठी आहे. त्यापेक्षा सिलिंडरचे भाव कमी करा, सर्वांना फायदा होईल. एकीकडे सिलिंडरच्या किमती वाढवायच्या आणि दुसरीकडे मोफत द्यायचे हे बरोबर नाही.-रागिणी कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या
तरुणींना व्यावसायिक शिक्षण मोफतज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील तरुणींना व्यावसायिक शिक्षण मोफत करण्यात येणार आहे. या घोषणेने आनंद वाटला. याचा नक्कीच फायदा तरुणींना होईल व त्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळेल.-गायत्री मिटकर, गृहिणी
अंमलबजावणी होणे महत्त्वाचेअर्थसंकल्पात तरुणी - महिला, युवक, शेतकरी यांच्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. काही योजनात आर्थिक तरतुदीही करण्यात आल्या आहेत. मात्र, या योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.-रोहिणी मिश्रा, शिक्षिका
योजना चांगल्या, अंमलबजावणीचे कायसरकार जनतेसाठी ज्या योजना जाहीर करते. त्या सर्व योजना चांगल्या असतात. यात वादच नाही. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी, कशा प्रकारे होते हे महत्त्वाचे आहे. महिलांसाठी महागाई हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर लक्ष देणे आवश्यक आहे.- सुनीता तगारे, सामाजिक कार्यकर्त्या