लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गढी येथील रीना सुनील दळवी यांच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. तत्पूर्वी त्यांना गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयातून बीडला रेफर केले होते. परंतु गेवराईहून आलेले रेफर लेटरच जिल्हा रुग्णालयात गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली आहे.गेवराई उपजिल्हा रुग्णालयात रीना दळवी यांना शुक्रवारी सायंकाळी प्रसूतीसाठी दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांनी निष्काळजीपणाने उपचार करीत तब्बल बारा तासांनी तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले होते; परंतु या दरम्यान रीनाची व बाळाची प्रकृती गंभीर झाली. यामध्ये बाळाचा गर्भातच गुदमरून मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. त्यानंतर रीनाचे आई-वडील शोभा भगवान गायकवाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृत अर्भक ताब्यात घेत सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.दरम्यान, हा सर्व प्रकार डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. गेवराईत काय उपचार केले व जिल्हा रुग्णालयात कुठल्या आधारावर रीनाला दाखल करून घेत पुढील उपचार केले, याचे रेफर लेटर असणे आवश्यक होते. त्याप्रमाणे हे लेटर जिल्हा रुग्णालयात आल्याची दप्तरी नोंद आहे; परंतु रीना दळवीच्या फाईलला हे लेटर नसल्याचे समोर आले आहे.गेवराई येथील उप जिल्हा रुग्णालयातील डॉ. रौफ यांना जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सहकार्य केले जात असल्याचा आरोप शोभा गायकवाड यांनी केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.दरम्यान, या प्रकरणामध्ये दोषी डॉक्टरांवर कारवाई होऊन यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
रीनाचे ‘रेफर लेटर’ रुग्णालयातून गायब !
By admin | Published: July 17, 2017 12:40 AM