औरंगाबाद : शहरातील १४ खासगी रुग्णालयांनी कोरोना आजाराच्या वैद्यकीय बिलात रुग्णांकडून जादा रक्कम आकारणी केली होती. त्यापैकी सात रुग्णालयांनी जादा आकारणी केलेली रक्कम सर्व रुग्णांना परत केली. मात्र, उर्वरित सात खासगी रुग्णालयांनी अद्याप काही रुग्णांना जादा आकारणी केलेली रक्कम परत केलेली नाही, या रुग्णालयांवर दंडात्मक अथवा फौजदारी स्वरूपाची अथवा रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी खासगी रुग्णालयांना दिलेला आहे.
डॉ. हेडगेवार रुग्णालय, सेठ नंदलाल धूत, एशियन, लाईफलाईन, वायएसके, अजिंठा आणि कृष्णा रुग्णालयांकडील ३७ लाख ३७ हजार२९९ एवढी रक्कम रुग्णांना परत करण्यात आलेली नसल्याने त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. सात दिवसांमध्ये रुग्णांना पैसे परत करण्याबाबत या रुग्णालयांना अंतिम संधी दिलेली आहे. जादा आकारणी केलेली रक्कम रुग्णांना परत केली नाही तर त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिला.
२४ लाख ९५ हजार केले परत
युनायटेड सिग्मा, एमआयटी, ओरियन सिटी केअर, अॅपेक्स, वुई केअर, एकविरा आणि हयात या सात खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडील जादा आकारणी केलेली पूर्ण रक्कम संबंधित रुग्णांना परत केलेली आहे, तर डॉ. हेडगेवार, सेठ नंदलाल धूत, एशियन हॉस्पिटल, लाईफलाइन, अजिंठा या खासगी रुग्णालयांनी अंशत: रुग्णांना रक्कम अदा केली आहे. या १४ खासगी रुग्णालयांची मिळून एकूण २४ लाख ९५ हजार ९९५ जादा आकारलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत केलेली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
१४ ते ३० नोव्हेंबर कालावधीत मिळणार प्रमाणपत्र
औरंगाबाद : राज्यातील पात्रताधारक अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्याकरिता विभागीय स्तरावर १४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंधरवडा राबविण्यात येत आहे. हा पंधरवडा यशस्वीपणे करण्यासाठी सर्व यंत्रणा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती, बालकांच्या काळजीसाठी कार्यरत असलेल्या संस्थांचे अधीक्षक व इतर सर्व संबंधितांनी अनाथ प्रमाणपत्रासंबंधित सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढावेत. प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले.
निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक जण महत्त्वपूर्ण
औरंगाबाद : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षणाचा योग्य उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, विभागात सर्वाधिक मतदान केंद्रे औरंगाबादला असून, २०६ मतदान केंद्रांवर ९८२५७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.