औरंगाबाद : गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एकाने बायजीपुरा येथे सोडण्याची मागणी एकाने रिक्षाचालकाकडे केली. तेव्हा आता उशीर झाला आहे. मला घरी जायचे आहे, असे सांगून रिक्षाचालकाने सोडण्यास नकार देताच त्या प्रवाशाने खिशातून चाकू काढला आणि रिक्षाचालकाच्या छातीत खुपसला. जिन्सी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून, जखमी रिक्षाचालकावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
नारेगाव येथील रिक्षाचालक शेख अय्याज शेख अहेमद (२५) हे गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आझाद चौकातील अरमान फर्निचर या दुकानासमोर पडलेले निरुपयोगी लाकडे जळतण म्हणून घेऊन जाण्यासाठी गोळा करीत होते. तेव्हा त्याठिकाणी फरहान फारुख शेख (३०, रा. बायजीपुरा) हा आला. त्याने रिक्षाचालकास ‘बायजीपुरा कहा है, मुझे रिक्षा से बायजीपुरा छोड दे’, अशी मागणी केली. तेव्हा रिक्षाचालक शेख अयाज यांनी उशीर झाला असल्यामुळे बायजीपुऱ्यात सोडणे शक्य नसल्याचे सांगितले. तेव्हा फरहान शेख याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व खिशातून चाकू काढूला अय्याजच्या छातीत खुपसला.
चाकूचा घाव लागल्यामुळे रिक्षाचालक मोठ्याने किंचाळला. तेव्हा चौकाच्या आजूबाजूला असलेले लोक पळत आले. त्यातील काही जणांनी अय्याज यांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याचवेळी घटनास्थळी दाखल झालेल्या जिन्सी पोलिसांच्या पथकाने आरोपी फरहान शेख यास ताब्यात घेत पोलीस गाडीत टाकून जिन्सी पोलीस ठाण्यात नेले. यानंतर जखमी झालेल्या अय्याज यास अधिक उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी जखमीचा रिक्षाचालकाचा मेहुणा शेख शाहरुख शेख युसूफ यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, २२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश मयेकर, उपनिरीक्षक हारुण शेख करीत आहेत.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेटआझाद चौकातील घटनास्थळी पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, राजेश मयेकर, उपनिरीक्षक गाेकुळ ठाकूर, पवार, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब जगताप आदींनी भेट दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती निरीक्षक केंद्रे यांनी दिली.