औरंगाबाद : चुलत मामाच्या मुलीसोबत साखरपुडा झाल्यानंतर सात महिने तिच्यासोबत संबंध ठेवले. मात्र नंतर लग्नाला नकार देणाऱ्या आरोपीला सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला ५ महिने जादा साधा कारावास भोगावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड येथील सचिन जाधव याचा त्याच्या चुलत मामाच्या २१ वर्षांच्या मुलीसोबत साखरपुडा झाला होता. २०११ च्या मे महिन्यात त्यांचे लग्न ठरले होते. तरुणीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याचे ठरले. यासाठी तिला नाशिक येथील महाविद्यालयात प्रवेश दिला होता. ३१ मे २०१२ रोजी सचिनने त्या तरुणीला मोटारसायकलवर बसवून औरंगाबादला आणले. बीबीका मकबरा येथे सचिनने मुलीच्या बोटात सोन्याची अंगठी घातली. तेथून ते पैठणला गेले. तेथे त्याने त्या तरुणीशी पहिल्यांदा संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ३१ मे २०१२ ते ८ डिसेंबर २०१२ पर्यंत सलग सात महिने सचिनने वेळोवेळी तिच्याशी संबंध ठेवले. नंतर १८ डिसेंबर २०१२ रोजी सचिन त्या तरुणीच्या गावी गेला. तरुणीचे बाहेर संबंध असल्याचे कारण सांगून त्याने साखरपुडा मोडला. पीडित तरुणीने १४ जानेवारी २०१३ रोजी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सचिनविरुद्ध भादंवि कलम ३७६ (१) नुसार गुन्हा दाखल केला. मूळ घटना पैठण येथे घडल्यामुळे नाशिक पोलिसांनी गुन्हा पैठणला वर्ग केला. तपास अधिकारी एस. व्ही. शहाणे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी युक्तिवाद केला.
सात महिने संबंध ठेवून लग्नास नकार; सात वर्षे कारावास
By admin | Published: June 03, 2016 11:39 PM