औरंगाबाद : बॅचलर ऑफ फाइन आर्ट अँड डिझाइन (बीएफए) या पदवी शिक्षणाणासाठी सध्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत राबवली जात आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पहिली प्रवेश फेरी पार पडली. पहिल्या फेरीत ५० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर काहींनी बेटमेंटचा पर्याय स्वीकारला असून, विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल अप्लाइड आर्टकडे दिसत आहे. दुसऱ्या फेरीसाठी पर्याय नोंदवण्यासाठी गुरुवारी सुरुवात झाली.
किलेअर्क येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात बीएफएच्या तीन शाखांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मुंबईत २, नागपूर आणि औरंगाबाद, असे राज्यात ४ शासकीय कला महाविद्यालये आहेत. येथील महाविद्यालयात बीएफए रेखा व कला (पेटिंग्ज)च्या १५ जागा, उपयोजित कला (अल्पाइड आर्ट) शाखेच्या ३५, तर वस्त्रकला (टेक्स्टाइल ॲण्ड डिझाइन) १५ जागा आहेत. त्यासाठी १०० टक्के अलाॅटमेंट झाले होते. त्यापैकी पहिल्या फेरीत पन्नास टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद नोंदवला आहे. त्यात उपयोजित कलेत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली. पहिली फेरी १४ ते १९ सप्टेंबरपर्यंत पार पडली.
रिक्त जागांची तात्पुरती यादी बुधवारी जाहीर झाली, तर गुरुवारपासून दुसऱ्या फेरीतील पर्याय भरण्यासाठी सुरुवात झाली असून, त्यासाठी ३ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहेत. २७ सप्टेंबर रोजी जागा वाटप यादी जाहीर होणार असून २८, २९, ३० सप्टेंबर आणि ३ ऑक्टोबर रोजी जागा वाटप झालेल्या संस्थेत प्रवेश निश्चिती करता येणार आहे, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. रमेश वडजे यांनी दिली.