औरंगाबाद : सुमारे ८० लाख रुपये किमतीच्या परराज्यातील चोरीच्या वाहनांच्या कागदपत्रांची पडताळणी न करताच पुनर्नोंदणी केल्याप्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह अन्य आरोपींविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयातील या घोटाळ्याची शहर गुन्हे शाखेने गतवर्षी डिसेंबरमध्ये पोलखोल करून दिलेल्या अहवालानंतर आरटीओ प्रशासनाने आपल्याच अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदविली.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ६ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हे शाखेने दोन संशयित हायवा ट्रक जप्त केले होते. यापैकी एमएच-२० ईएल-३२३९ हा ट्रक मूळचा मणीपूर राज्यातील आहे. या ट्रकची औरंगाबादेतील आरटीओ कार्यालयात पुनर्नोंदणी केल्याची माहिती ट्रकमालकाने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी आरटीओतून या हायवाच्या पुनर्नोंदणीकरिता गाडीमालकाने सादर केलेल्या कागदपत्राच्या सत्यप्रती प्राप्त केल्या. कागदपत्रानुसार हा ट्रक अशोक लेलॅण्ड कंपनीनिर्मित आणि एचडीएफसी इर्गो कंपनीचा त्यावर विमा होता. प्रत्यक्षात मात्र हा ट्रक टाटा कंपनीचा आणि विम्याची कागदपत्रेही बनावट असल्याचे दिसून आले. अर्जदाराने कागदपत्रासोबत जोडलेल्या आधार कार्डवरील पत्त्यानुसार तो रेल्वेस्टेशन परिसरात राहत नसल्याचे स्पष्ट झाले.
आरोपींनी परराज्यातील आरटीओची आॅनलाईन मागविलेली एनओसी आणि अन्य कागदपत्रांची पडताळणी, ट्रकची प्रत्यक्ष तपासणी न करताच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नकाते यांनी या ट्रकची पुनर्नोंदणी केल्याचे पोलीस तपासात दिसून आले. यासोबतच नकाते यांनी वाहन क्रमांक एमएच-२० ईएल-३२३६, वाहन क्रमांक एमएच-२० ईएल-३२३७, एमएच-२० ईएल-३२३८, एमएच-२० ईएल-३२४० यांचीही बनावट कागदपत्रांच्या आधारे पुनर्नोंदणी केल्याचे तपासात समोर आले. परराज्यातील वाहनांची महाराष्ट्रात नोंदणी करायची असेल तर त्याकरिता केंद्रीय आणि राज्य सरकारने विशेष नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचा वापर करणे आरटीओ अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. नकाते यांनी सर्व नियम पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने वाहनांची पुनर्नोंदणी केल्याचा अहवाल गुन्हे शाखेने परिवहन विभागाला दिला होता. याआधारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी बुधवारी रात्री वेदांतनगर ठाण्यात नकाते आणि वाहनमालकांविरोधात फिर्याद नोंदविली.
अधिकार नसताना केली नोंदणीपरराज्यातील वाहनांच्या पुनर्नोंदणीचे अधिकार उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना आहेत. सहायक प्रादेशिक अधिकारी नकाते यांनी आरोपींसोबत संगनमत करून चोरीच्या हायवांची पुनर्नोंदणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरीच्या वाहनांची परराज्यातील आरटीओ कार्यालयात नोंदणी असल्याचे बनावट कागदपत्रे तयार करून वाहने विकणाऱ्या टोळीला नकाते हे गुपचूप मदत करीत होते.