औरंगाबाद : वाहनचोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आता पोलिसांनी वाहनचोरीचे गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ सुरू केल्याचे समोर आले आहे. जून आणि आॅगस्टमध्ये चोरी झालेल्या दुचाकी गुन्हेशाखेकडून चोरट्यांनी हस्तगत केल्याची माहिती मिळाल्यानंतर हर्सूल पोलिसांनी वाहनचोरीचे गुन्हे नोंदविले.
वर्षभरापासून शहरात प्रतिदिन सरासरी तीन दुचाकी चोरटे पळवित आहेत. यासोबतच तीनचाकी रिक्षा, मालवाहू ट्रक आणि कारही चोरीला जात आहेत. वाहनचोरी रोखण्यासाठी गुन्हेशाखेसोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. याकरीता प्रत्येक ठाण्यात डी.बी. पथक कार्यरत असते. शहरातील सिडको, एमआयडीसी सिडको आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाकडून दुचाकी चोरट्यांविरोधात भरीव कामगिरी सुरू आहे. गुन्हेशाखेने सहा महिन्यात दुचाकीचोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणले. मात्र अन्य पोलीस ठाण्यांकडून वाहनचोरी रोखण्यासाठी ऐवजी गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले. वाहनचोरीच्या जुन्या घटनांपैकी हर्सूल परिसरातील जहांगीर कॉलनीत राहणाऱ्या शेख शोएब बक्ष शेख अफसर यांचा घरासमोर उभी मोटारसायकल ( एमएच-४८झेड ४१८९) चोरट्यांनी १० जूनच्या रात्री पळविली होती. तसेच चेतनानगर येथील कडूबा पुंडलिक साळवे यांची मोटारसायकल ( एमए-२०सीडी ७६६९) १८ आॅगस्ट रोजी चोरीस गेली. ८ सप्टेंबर रोजी गुन्हेशाखेने चोरट्यांकडून या दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या. यानंतर हर्सूल पोलिसांनी फिर्यादीकडून वाहनचोरीची स्वतंत्र तक्रार नोंदवून घेतली. टी व्ही सेंटर रस्त्यावरील वाहनतळावर अॅड. हर्षद भागचंद शिंदे यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच-२०डीएस ४५३९) चोरट्यांनी चोरून नेली होती. ही घटना २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली. याबाबत त्यांनी ८ सप्टेंबर रोजी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली. ईस्माईल गौस खान यांची दुचाकी (एमएच-२०सीडी ३८२५) चोरट्यांनी पळविली. दुसऱ्या दिवशी ईस्माईल खान यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.
वाहन चोरीची रजिस्टमध्ये नोंदवाहनचोरीची तक्रार देण्यासाठी ठाण्यात आलेल्या व्यक्तीची तातडीने गुन्हा नोंदवून घेण्याची जबाबदारी ठाणेदाराची असते. मात्र वाहनचोरीची केवळ नोंद एका रजिस्टरमध्ये केली जात आहे. याकरीता प्रत्येक ठाणेदारांनी असे रजिस्टर ठेवले आहेत . गुन्हाच नोंद न झाल्याने वाहनचोरीचा तपास होत नाही. एवढेच नव्हेतर गाडीचा शोध घ्या असा सल्ला तक्रारदाराला देऊन पोलीस मोकळे होतात.