छत्रपती संभाजीनगर : हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी प्रा. डॉ. सुधीर नरहर रसाळ हे शनिवारी (दि.१० ऑगस्ट) वयाची नव्वदी पूर्ण करीत आहेत. कठोर परिश्रम व सचोटीने वाङ्मय क्षेत्रात आपले आगळेवेगळे ‘प्रतिष्ठान’ निर्माण करणारे, विविध शेकडो मानसन्मान प्राप्त सरांना आपण संस्कृत शिकू शकलो नाही याची आजही खंत वाटते.
रसाळ सरांचा नव्वदीतही तोच जोम व जोष हा सळसळत्या तारूण्यालाही लाजविणाराच. आजही नित्यनेमाणे त्यांचे वाचन व लेखन सुरू आहे. शनिवारी नव्वदीपूर्ण करून शतकी वाटचालीकडे निघालेल्या सरांचा शुक्रवारी सायंकाळी सत्कार व त्यांनी लिहिलेले १६ वे पुस्तक ‘ नव्या वाटा शोधणारे कवी’ याचे प्रकाशन झाले.
आजही प्रतिष्ठेच्या शिखरावर आरूढ झालेल्या सरांना नेमकी खंत बरे काय असेल? सरांना विचारले तर ते सांगतात, मला संस्कृत शिकता आले नाही, ही आयुष्यात राहून गेलेली गोष्ट व त्याची आजही खंत वाटते. संस्कृत भाषेत भारत मुनी (नाट्य शास्त्र), आनंद वर्धन, अभिनव गुप्त व मंमट यांनी ज्या प्रकारे समीक्षेची भर घातली ती मला मुळापासून समजून घेता आली नाही. मूलभूत विचार समजून घेणे व भाषांतर वाचून समजून घेणे यात मूलत: फरक असतो व तो कायम राहिला आहे. भाषांतरित वाचल्यामुळे वरील विभुतींची कलाकृतीची सत्यता तपासता आली नाही.
मुलगी वंदनाचा जन्म हा आयुष्यातील सर्वांत आनंदी क्षणनामांकित संस्था, सरकार व समाजाने रसाळ सरांवर तेवढेच प्रेम केले. त्यांना नामांकित असे २२ पुरस्कार प्राप्त आहेत. याशिवाय शेकडो सत्कार सोहळे वेगळेच; पण सरांना त्यांच्या आयुष्यातील सर्वांत गोड क्षण कोणता वाटत असावा. सर सांगतात, माझी पहिली कन्या वंदना (सध्या शारदा मंदिर शाळेची उपमुख्याध्यापिका) हिचा जन्म हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंददयी क्षण आहे. तसे पाहिले तर ९० वर्षांच्या काळात अनेक आनंदाचे क्षण आले; पण वंदनाचा जन्माचा क्षण मला आजही तेवढाच ताजा वाटतो.
समीक्षेच्या क्षेत्रातील नाममुद्रा झालेले रसाळ सर म्हणाले, गंगाधर गाडगीळ, बा.सी. मर्ढेकर व वा.ल. कुलकर्णी यांच्या समीक्षेने मला भुरळ पाडली. त्याचे विचार मार्ग मला आवडले. तार्किकदृष्ट्या त्यांच्या व माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत मला साम्य आढळले. त्यांच्या समीक्षेचा माझ्यावर निश्चितच प्रभाव आहे.
विद्यमान स्थितीत एखाद्या पुस्तकाची समीक्षा करताना आपली काय भावना, आपल्यावर दडपण असते का? असे विचारले असता सर म्हणाले, लेखकाचे पुस्तक वाचल्यावर त्यातील गुण-दोष जेव्हा मी दाखवितो, त्यावेळेस मी कटाक्षाने त्यांच्या भूमिकेबद्दल, दोषाबद्दल लिहतो. व्यक्तिगत टीका केली नाही व करत नाही. माझ्या लेखनामुळे काही लेखक दुखावले; पण मी कधी आकस धरला नाही. समीक्षेच्या क्षेत्रात काम करताना पाश्चात्य समीक्षेच्या कुबड्या टाकून स्वतंत्रपणे विचार करायला हवा. जोपर्यंत स्वतंत्र विचाराने एखाद्या कलाकृतीकडे पाहणार नाही, तोपर्यंत त्याची गुणग्राहकता दाखविता येणार नाही, असा सल्लाही ते उदयोन्मुख समीक्षकांना देतात.
गांधेलीच्या सुपुत्राची गरुडझेपरसाळ कुटुंब मूळचे गांधेलीचे. (ता.जि. छत्रपती संभाजीनगर). त्यांच्या वडिलांकडे या गावची पाटलकी व कुळकर्णीकी होती. सुधीर यांचा जन्म १० ऑगस्ट १९३४ रोजी वैजापुरात झाला. शालेय शिक्षण सरस्वती भुवनमध्ये व नंतर उच्च शिक्षण मिलिंद महाविद्यालयात त्यांनी घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा योगही त्यांना आला. त्यांनी लिहिलेली १६ पुस्तके व ४ पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. अनेक संशोधन लेखही त्यांनी लिहिले. शासकीय कला महाविद्यालय व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यापन त्यांनी केले.