औरंगाबाद : तोंडोळी येथील दोन महिलांवर सामूहिक अत्याचार आणि लुटमारीच्या घटनेअगाेदर दरोडेखोरांनी परिसराची रेकी केली होती. त्याचवेळी महिलांनाही पाहण्यात आले. त्यानंतर दरोडा टाकून महिलांवर अत्याचार केल्याची कबुली अटकेतील आरोपींकडून प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
तोंडोळी (ता. पैठण) येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या परप्रांतीय कुटुंबावर हल्ला चढवत लूटमार केली. कुटुंबातील दोन महिलांना बाजूला घेऊन जात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रकार १९ ऑक्टोबरच्या रात्री घडला होता. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती. या टोळीचा प्रमुख कुख्यात प्रभू श्यामराव पवार (रा. दुधड, ता. औरंगाबाद) याच्या अटकेनंतर ७ जणांनी हा दरोडा टाकल्याचे समोर आले. आरोपींनी पोलीस कोठडीत दिलेल्या माहितीनुसार, तोंडोळीत दरोडेखोरांनी अगोदरच रेकी केली होती. तेथे महिलांना पाहून अत्याचार करण्याच्या उद्देशानेच दरोडा टाकण्यात आला. त्यासाठी दरोडेखोर दारू पिऊन आले. अत्याचारानंतर त्या परिसरातच पुन्हा दारू पिऊन, संडास करून निघून गेले. त्यामुळे पोलिसांना आरोपी शोधण्यास मदतच झाल्याचेही समोर आले.
प्रभूच्या अटकेनंतर विजय प्रल्हाद जाधव (रा. ढोरकीन) , सोमिनाथ बाबासाहेब राजपूत, नंदू भागिनाथ बोरसे (रा. वैजापूर), अनिल भाऊसाहेब राजपूत (रा. मांजरी, ता. गंगापूर) आणि किशोर अंबादास जाधव (रा. गिधड, ता. पैठण) या आरोपींना पोलिसांंनी बेड्या ठाेकल्या. एक आरोपी अद्यापही सापडलेला नाही. त्याच्या मागावर पोलिसांचे पथक आहे.
स्थानिक गुन्हे शाखा मागावरप्रभू पवार याच्या टोळीने या घटनेपूर्वी काही दिवस परिसरात धुमाकूळ घातलेला होता. त्यामुळे या टोळीच्या मागावरच स्थानिक गुन्हे शाखा होती. सिडको एमआयडीसी आणि चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडे याच टोळीने टाकले होते. त्यातील सुलतानपूरवाडी येथील दरोड्यात आरोपींनी महिला आहे का? याचाही शोध घेतला होता. मात्र, त्या कुटुंबात एकही महिला नव्हती. मारहाण केलेल्या व्यक्तीला बायको, सून का लपवली म्हणूनही मारहाण केल्याचे चौकशी समोर आले आहे.
महिनाभरात १३ ठिकाणी टाकले दरोडेप्रभू पवार हा तीन महिन्यांपूर्वीच कारागृहात बाहेर सुटला होता. बाहेर आल्यानंतर त्याने तयार केलेल्या टोळीने १३ हून अधिक दरोडे टाकल्याची माहिती चौकशीत दिली आहे. यात चिकलठाणा, एमआयडीसी सिडकोतील दरोड्यांचाही समावेश आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिले रिवॉर्डया दरोडेखोरांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा, बीडकीन पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश मिळाल्यामुळे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी तपासात सहभागी अधिकाऱ्यांना रोख रिवॉर्ड दिले. यात एलसीबीचे निरीक्षक संतोष खेतमाळस, बीडकीनचे ठाणेदार संतोष माने, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठुबे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.