वाळूज महानगर : जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करणसाठी सोमवारी ग्रामपंचायतीच्या विशेष सभा घेण्यात आली. मात्र या सभेला सत्ताधारी व विरोधी गटाच्या सर्वच सदस्यांनी दांडी मारल्यामुळे हा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला.
विद्यमान सरपंच सोनू लोहकरे व उपसरपंच मंगल निळ यांना वर्षभरासाठी जीवदान मिळाले आहे.गंगापूर तालुक्यातील अर्थिकदृष्टया सक्षम म्हणून ओळखल्या जाणाºया या ग्रामपंचायत राष्टÑवादी काँग्रेस व शिवसेनेने युती करीत ताब्यात घेतली आहे. तत्कालीन सरपंच प्रविण दुबिले यांनी एका कंपनीला करारात सूट दिल्याचा ठपका ठेवल्याने त्यांना सरपंच पदावरुन पायउतार व्हावे लागले. सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरु झाल्यामुळे डॉ. निळ यांनी शिवसेनेच्या तीन सदस्यांना आपल्या बाजुने वळविले होते. यानंतर झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सेनेच्या सोनू अमोल लोहकरे तर उपसरपंचपदी मंगलबाई ज्ञानेश्वर निळ यांनी निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीच्या कारभार सुरळीत सुरु असतांना आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विरोधी गटाने हालचाली सुरु केल्या होत्या. आपल्या वर्चस्वाला विरोधी गट धक्का लावण्याची तयारी करीत असल्याची कुणकुण लागताच सरपंच सोनू लोहकरे व उपसरपंच मंगलबाई निळ यांनी परस्पर विरोधात गत आठवड्यात अविश्वास प्रस्ताव दाखल केले होते.
यावर चर्चेसाठी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेला नियोजित वेळेत १७ सदस्यांपैकी एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने डॉ. जºहाड यांनी सरपंच सोनू लोहकरे व उपसरपंच मंगल लोहकरे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्याचे जाहीर केले. यावेळी सहायक अध्यासी अधिकारी म्हणून रांजणगाव सज्जाचे तलाठी राहुल वंजारी, ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव यांनी काम पाहिले.