औरंगाबाद : शहरात अलीकडेच उघडकीस आलेल्या गर्भलिंग निदानाच्या गुन्ह्यातील आरोपी डॉ. सूरज सूर्यकांत राणा, गणेश प्रभाकर गोडसे, डॉ. वर्षा सरदारसिंग शेवगण, डॉ. सुनील बाबासाहेब पोटे आणि राजेंद्र काशीनाथ सावंत यांचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मंगळवारी (दि.९ ) नामंजूर केला.यासंदर्भात डॉ. अमरज्योती जयंत शिंदे यांनी फिर्याद दिली होती. २१ जानेवारी २०१९ रोजी तक्रार करण्यात आल्यानंतर २२ जानेवारी २०१९ रोजी स्टिंग आॅपरेशन करण्यात आले होते. त्याचदिवशी गर्भलिंग निदान प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय दंडसंहितेचे कलम ३१५, २०१, ४१७ सह ३४, तसेच पीसीपीएनडीटी कायद्याचे कलम २३ आणि मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्याचे कलम २७, ३३, ३७, ४१ व सौंदर्य व प्रसाधन कायदा १९४० चे २७ (३)(२), १८ (क) सह एमटीपीसी कायद्याच्या ५(२)(३)(४) अन्वये जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. सूरज सूर्यकांत राणा (४२, रा. उस्मानपुरा), गणेश प्रभाकर गोडसे (२८, रा. खेडगाव, ता. अंबड, जि. जालना), डॉ. वर्षा सरदारसिंग शेवगण, डॉ. सुनील बाबासाहेब पोटे व राजेंद्र काशीनाथ सावंत या आरोपींनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.अर्जावरील सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, प्रकरण गंभीर व काळिमा फासणारे असून, गुन्ह्यात सर्व आरोपींचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपींना जामीन मंजूर केल्यास आरोपी पीडितेला धमकावू शकतात, तसेच पुरावा नष्ट करू शकतात. त्यामुळे आरोपींचा नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने सर्व आरोपींचा नियमित जामीन अर्ज नामंजूर केला.
गर्भलिंग निदानाच्या गुन्ह्यातील पाच आरोपींचा नियमित जामीन नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:18 AM