औरंगाबाद : मुंबईहून कर्तव्य बजावून आलेल्या एसटी वाहकाचा कोरोनामुळे मंगळवारी सकाळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथे घडली. वाहकाने एसटी महामंडळाकडे मुंबईला पाठवू नका अशी विनंती केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी विनंती धुडकावून लावल्याने त्यांना मुंबईला जावे लागले होते. एसटी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका वाहकाने आपली ह्रदयाची बायपास शस्त्रक्रिया झालेली असल्याने मुंबईला पाठवू नये, अशी विनंती एसटी महामंडळाकडे केली होती, मात्र तरीही सदर वाहकाला कर्तव्यासाठी मुंबईला पाठविण्यात आले. १८ फेब्रुवारीस ते मुंबईला गेले त्यानंतर दोनच दिवसात ते औरंगाबादला परतले. त्यानतंर दोन दिवस सुटी घेऊन ते पुन्हा औरंगाबाद येथे सेवेत दाखल झाले. दरम्यान, सोमवारी त्रास जाणवू लागल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हृद्य शस्त्रक्रिया झाली असतानाही मुंबईला पाठवणे, परत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली नाही, महामंडळाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचा कोरोना मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तसेच मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली.
दरम्यान, विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली. नातेवाईकांनी वाहकाच्या कुटुंबातील एकाला नोकरी देणे, त्यांना मुंबईला पाठविणाऱ्या संबंधित एसटी महामंडळाच्या अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.