वैजापूर : कोरोना रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आनंदाच्या भरात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रविवारी रात्री जल्लोष करून साथरोग नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात माजी उपनगराध्यक्षांसह त्यांच्या नगरसेवक मुलाचाही समावेश आहे.
तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या १०४ वर पोहोचली असून, यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. शहरातील माजी उपनगराध्यक्षांसह त्यांच्या कुटुंबातील काहींना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे शहर व बाजार समितीचे कांदा मार्केट प्रशासनाला बंद करावे लागले आहे, तसेच जवळपास एक हजार नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. उपनगराध्यक्षांवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली. ते घरी परतल्यानंतर सोमवारी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
आंबेडकर पुतळा परिसरात हारतुरे घेऊन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बाजारतळ परिसरात प्रतिबंधित क्षेत्र असताना तेथील बॅरिकेडस् काढून टाकत समर्थकांनी प्रवेश करीत आतषबाजी केली केली. तोंडाला मास्क न लावणे, साथरोग नियंत्रण कायद्याचा, तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केला. याप्रकरणी हवालदार महादेव आरखराव यांच्या फिर्यादीवरून उपनगराध्यक्षांसह २०० जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरवणूक काढण्यास परवानगी नव्हती. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, वैजापूर