औरंगाबाद : घाटी रुग्णालयाला रेमडेसिविर इंजेक्शन मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे दाखल रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी भटकंती सुरुच आहे. घाटीत दाखल असलेल्या एका रुग्णास चार इंजेक्शन देण्यात आलेले होते. रुग्णाला मंगळवारी शेवटचे पाचवे इंजेक्शन द्यावे लागणार होते, मात्र, ते घाटीत उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.
त्यामुळे घाटीतील चिठ्ठी घेऊन नातेवाईक शहरातील खाजगी रुग्णालयांतील मेडिकल स्टोअरवर विचारणा करीत फिरत होते. अनेक ठिकाणांहून नकार मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. अखेर औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे इंजेक्शन प्राप्त झाले आणि नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
घाटी रुग्णालयास रविवारी १४, सोमवारी १४ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले. मंगळवारी ३०० इंजेक्शन प्राप्त होणार होते. परंतु त्यास विलंब झाला. हे ३०० इंजेक्शन बंगळुरू येथून मुंबईमार्गे बुधवारी येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. मात्र, बुधवारीही हे इंजेक्शन घाटीला प्राप्त होण्याची शक्यता धुसर आहे.