लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेलेल्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी दोषी डॉक्टरावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नऊ तास दवाखान्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होेते.तालुक्यातील कुंभारी (बा.) येथील राहुल तुकाराम जुंबडे (वय ९ वर्षे) या मुलास २९ सप्टेंबर रोजी सकाळी ताप आला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांनी राहुलला परभणी येथे आणून एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले. दवाखान्यात आणण्यापूर्वी मुलाची प्रकृती चांगली होती. तो स्वत: चालत दवाखान्यात आला. मात्र डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्याच्या तोंडास अचानक फेस आला, अंग थंड पडले. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी त्यास आय.सी.यु.मध्ये हलविण्याचा सल्ला दिला. राहुलला आय.सी.यु.मध्ये हलविण्यात आले. तेथे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला, असा पालकांनी आरोप केला. त्यानंतर डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास खाजगी दवाखान्यासमोर ठिय्या मांडला. दोषी डॉक्टरावर गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह न हलविण्याचा पवित्रा नातेवाईक आणि मित्रांनी घेतला. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर घटनास्थळी दाखल झाले. दवाखान्यासमोर पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह न हलविण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास खा.बंडू जाधव यांनी या ठिकाणी भेट दिली. नातेवाईकांशी चर्चा केली. रात्री १० वाजेपर्यंत या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने गुन्हा नोंद झाला नव्हता.
नातेवाईकांचा नऊ तास ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:06 AM