औरंगाबाद : मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केलेल्या १९ वर्षीय पीडितेचा येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान बुधवारी (२८ ऑगस्ट) रात्री ९ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. महिनाभरानंतरही आरोपींना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यांच्या अटकेनंतरच पिडीतेचा मृतदेह ताब्यात घेणार असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. तसेच तिच्यावर महिनाभरापासून उपचार सुरू असताना येथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी १९ वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भाऊ, भावजयीकडे राहण्यासाठी गेली होती. ७ जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते, असे घरी सांगून बाहेर पडल्यानंतर चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हापासून ती आजारी पडली. प्रकृती अधिक खालावल्याने तिच्या वडिलांनी तिला २५ जुलै रोजी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले तेव्हा तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच तिला असाध्य रोग असल्याचे लक्षात आले. पीडितेचे शरीर उपचारास प्रतिसाद देत नव्हते. यातच पीडितेचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. असाध्य रोग असल्याने तिच्यावर उपचार करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी अधिष्ठातांकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी दुपारी केली.
मुंबईतील सामुहिक बलात्कार घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा - खासदार सुप्रिया सुळे
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार सुरुवातीला या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. मुंबईच्या चेंबूर परिसरातील घटना असल्याने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील कारवाईसाठी हा गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यांकडे वर्ग केला. या घटनेला महिना होऊनही पोलिसांना आरोपी पकडण्यात यश आले नाही. सर्व आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.