सिल्लोड : डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. माय-लेकीचे मृतदेह गावाजवळील एका विहिरीत सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यांनी आत्महत्या केली नसून बलात्कार करून त्यांची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्यानंतर मंगळवारी सकाळी शासकीय रुग्णालय घाटी येथे मृतदेहांचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, यानंतर नातेवाईक आणि सामाजिक संघटनांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने रुग्णालयात तणावपूर्ण स्थिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंगरगाव येथील विवाहिता ७ वर्षीय मुलीसह तीन दिवसांपासून बेपत्ता होती. कुटुंबातील लोकांनी, नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. त्यामुळे शनिवारी (दि.१५) सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडे याबाबत नातेवाईकांनी दोघी बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली. सोमवारी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान या माय-लेकीचे मृतदेह येथील एका विहिरीत आढळून आले. माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. तसेच नातेवाईकही घटनास्थळी जमा झाले. दरम्यान, सोमवारी दुपारी १२ वाजता दोघींचेही प्रेत विहिरीबाहेर काढण्यात आले. प्रेत नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका वेळेवर आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी उशिरा आलेल्या रुग्णवाहिकेवर दगडफेक करून परतवून लावले. यानंतर खाजगी वाहनाने दोघींचेही पार्थिव सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे मोठ्या संख्येने नागरिकांसह मयतांचे नातेवाईक जमा झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे आणण्यात आले.
घाटी रुग्णालयात मांडला ठिय्या सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील विहिरीत मृतावस्थेत आढळलेल्या माय-लेकींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोमवारी सायंकाळी घाटी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र सायंकाळी ६ वाजेनंतर घाटीत शवविच्छेदन होत नाही. यामुळे आज मंगळवारी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, माय-लेकींच्या मृत्यूविषयी नातेवाईक आणि सामाजिक संघटनांनी संशय व्यक्त करून आरोपींना अटक करण्याची मागणी करत घाटीत ठिय्या मांडला आहे. यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.