औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एका रुग्णाचा मृतदेह ४ दिवसांपासून शवागृहातच पडून राहिला. चुकीच्या पत्त्यामुळे नातेवाइकांचा शोध लागत नव्हता. अखेर नातेवाइकांचा शोध लागला आणि मृत्यूच्या वार्तेने नातेवाइकांनी घाटीत धाव घेतली. मृत्यूच्या ४ दिवसांनंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
विजय पांडुरंग मोरे (५२, रा) असे मृत रुग्णाचे नाव आहे. घाटी रुग्णालयात ढाकेफळ, ता. पैठण, असा पत्ता नमूद करण्यात आला होता; परंतु पिंपळवाडी, पैठण असा मूळ पत्ता होता. कोरोनामुळे ८ एप्रिल रोजी ते घाटीत भरती झाले होते. उपचार सुरू असताना १३ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर घाटीतील समाजसेवा अधीक्षकांनी रुग्ण दाखल होताना दिलेल्या दोन्ही मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला; परंतु एक मोबाइल नंबर बंद होता. तर दुसऱ्या नंबरवर संपर्क झाला; मात्र नातेवाईक असल्यासंदर्भात स्पष्टता झाली नाही. त्यामुळे १३ एप्रिलपासून विजय मोरे यांचा मृतदेह घाटीतील शवागृहातच होता. याविषयी ‘लोकमत’ने १७ एप्रिल रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. समाजसेवा अधीक्षकांकडून चार दिवसांपासून नातेवाइकांचा शोध घेतला जात होता.
अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सदर रुग्णाच्या नातेवाइकांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याशी संपर्क साधला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, समाजसेवा अधीक्षक बालाजी देशमुख, संतोष पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी प्रतीक्षा स्वामी, संजय वाकुडकर यांनी समन्वय साधला. अखेर नातेवाइकांचा शोध लागला.
पुतण्याचा रक्तदाब झाला कमी
मृतदेह पाहिल्यानंतर पुतण्याचा रक्तदाब कमी झाला होता. पत्ता चुकीचा टाकल्याने गोंधळ झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. सदर रुग्णाचा अंत्यविधी झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली.
फोटो ओळ...
‘लोकमत’मध्ये १७ एप्रिल रोजी प्रकाशित वृत्त.