औरंगाबाद : चोरट्या मार्गाने कत्तलीसाठी वाहनातून नेण्यात येणाऱ्या ५ गायी आणि १५ बैलांची पोलिसांनी १३ जानेवारी रोजी सकाळी सुटका केली. याप्रकरणी चालकासह दोन जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले की, सिटीचौक ठाण्याचे अधिकारी- कर्मचारी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी गस्तीवर असताना फाजलपुरा येथे एका ट्रकमधून गोवंशाची वाहतूक सुरू असल्याचे त्यांना दिसले. पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा देताच ट्रक (एमएच-२० डीई-७७३९) मधील एक जण पळून गेला. चालक शेख रमजानी (रा. बोरगाव) हा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये निर्दयीपणे कोंबलेल्या स्थितीत ५ गायी आणि १५ बैल आढळले. पोलिसांनी या सर्व पशुधनाची मुक्तता केली. हवालदार तुकाराम चव्हाण यांच्या तक्रारीवरून आरोपी चालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
==========================
दुचाकीचालकावर अपघाताचा गुन्हा
औरंगाबाद : केटरिंग कामासाठी चिकलठाणा येथे जाणाऱ्या योगेश लोखंडे या तरुणाला २७ डिसेंबर २०२० रोजी मोटारसायकलची धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध (एमएच-२० एफबी-६५५६) गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी सुरेश गोविंद लोखंडे यांनी तक्रार नोंदविली.
===============
मॉलसमोरून मोटारसायकल पळविली
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलसमोर उभी करून ठेवलेली मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली. मुकेश किशोर दाभाडे (रा. शाक्यनगर भोईवाडा) यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.
=====================
जुन्या भांडणातून तरुणाला मारहाण
औरंगाबाद : जुन्या भांडणाच्या कारणातून विपुल मधुकर चाबूकस्वार (रा. तोरणागडनगर, एन-२ सिडको) यांना आरोपी किरण बनकर ऊर्फ चिमण्या आणि त्याच्या साथीदारांनी लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. ही घटना ८ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास प्रकाशनगर येथे घडली. याप्रकरणी विपुलने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.