औरंगाबाद : कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार संजयसिंग डोभाळ यांचा गळा दाबून, धक्काबुक्की करणारा आरोपी शाकेर शहा शौकत शहा (३०, रा. मिलींद नगर, उस्मानपुरा) याची ‘प्रोबेशन ऑफ अफेंडर्स ॲक्ट’ नुसार एक वर्षाच्या ‘चांगल्या वर्तणुकीच्या हमी पत्रावर’ सुटका करण्याचे आदेश सत्र न्यायाधीश ए.डी. लोखंडे यांनी दिले. मात्र, आरोपीने हमीपत्रातील अटींचा भंग अथवा उल्लंघन केल्यास त्याला भादंवि कलम ३५३ अन्वये दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल आणि दोन हजार रुपये दंड भरावा लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय होती घटना ?उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन अंमलदार संजयसिंग डोभाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३ ऑक्टोबर २०१७ रोजी सायंकाळी ते कर्तव्यावर होते. मिलिंदनगर येथे राहणारे तालेब शहा इब्राहिम शहा (५०) आणि फेरोज शहा ठाण्यात आले. त्यांनी जावई शाकेर शहा कौटुंबिक वादातून आत्महत्येची धमकी देत असल्याचे सांगितले. पोलीस तेथे जाऊन समजावत असताना शाकेरने काचेचा तुकडा स्वत:च्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काच हिसकावून घेतली. या झटापटीत शाकेरने डोभाळ यांचा गळा दाबून त्यांना धक्काबुक्की केली.
प्रकरणात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागूल आणि सरकारी वकील ए. बी. देगावकर यांनी ५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पैरवी म्हणून जमादार बी.एस. हिवराळे यांनी काम पाहिले.