पैठण: नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडी धरणात पाणी सोडून पैठण तालुका दुष्काळी घोषित करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारी माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली पैठण छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय मार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणाऱ्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा निषेध करण्यात आला. रास्तारोकोमुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
जायकवाडी धरणात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ऊर्ध्व भागातील म्हणजे नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहात ७९ ते ८८ टक्के पाणीसाठा आहे. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार १५ ऑक्टोबरला आढावा घेऊन जायकवाडी धरणाची तूट लक्षात घेता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी ऊर्ध्व भागातील मुळा समूह, प्रवरा समूह, गंगापूर समूह आणि गोदावरी दारणा समूहातून एकूण ८.६०३ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र या आदेशास स्थगिती मिळावी म्हणून नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील पुढारी न्यायालयात गेल्याने अद्याप पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याने मराठवाड्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. शुक्रवारी माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनात भाग घेतला.
पैठण तालुका दुष्काळी घोषित करा, खेर्डा प्रकल्पात जायकवाडी धरणातून पाणी सोडा, उजव्या कालव्यातून पाणी सोडा, हिरडपुरी व आपेगाव बंधाऱ्यात पाणी सोडा आदी स्थानिक मागण्या दत्ता गोर्डे यांनी मांडल्या. आंदोलनात संत एकनाथ सचिन घायाळ शुगरचे चेअरमन सचिन घायाळ, अनिल घोडके, प्रल्हाद औटे,आबासाहेब मोरे, गोपिनाना गोर्डे, सुरेश दुबाले,आप्पासाहेब गायकवाड, बद्रीनारायण भुमरे भाऊसाहेब पिसे, निवृत्ती बोबडे, चंद्रकांत झारगड, दिनेश पारीख, दिपक हजारे, अस्लम पठाण, निसार भाई, राजू बोबडे, सदाशिव नलावडे, शिवाजी साबळे, उद्धव मापारी, विष्णूपंत नलावडे, किशोर काळे, मुनावर शेख, महादेव ठोके, रऊफ शेख, कल्याण म्हस्के, रुषी उगले, बहादुर शेख, शिवाजी लांडगे, कैलास मापारी, गणेश जगताप, अशोक औटे, एकनाथ नवले, एकनाथ बेळगे, प्रकाश दिलवाले, बाळु ढाकने, शुभम गायकवाड, संजय सदावर्ते, राजू नवथर, आबासाहेब मगर, मार्तंड लीपाने यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे पैठण छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.