औरंगाबाद : महापालिकेला रिलायन्स कंपनीच्या ‘फोर-जी’ चे काम करणार्या गुत्तेदारांकडून २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. ही रक्कम मनपाने गुत्तेदारांची बिले अदा करण्यासाठी वाटली आहे. त्यामुळे साडेसात कोटी रुपयांचे पॅचवर्क कशातून करायचे, याचा मोठा प्रश्न पालिकेसमोर उभा आहे. पॅचवर्कच्या कामांबाबत शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी आज गुत्तेदारांची बैठक घेतली. त्या २४ कोटींतून पॅचवर्क करण्याचे नियोजन होते. कारण २४ कोटी रुपयांमध्ये १६३ कि़ मी. अंतराचे ७२ रस्ते खोदण्याची परवानगी मनपाने रिलायन्सच्या गुत्तेदाराला दिली होती. ३१ कोटी रुपयांतून व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली होती. १४ पैकी ४ रस्त्यांची कामे सुरू आहेत. रिलायन्सकडून आलेले २४ कोटी रुपये रस्ते व पॅचवर्ककडे वळती करण्यात येणार होते. मात्र, प्रशासनाने १८ कोटींचा पहिला टप्पा गुत्तेदारांची देणी देण्यात खर्च केला. दुसरा टप्पा ६ कोटींचा तोही गुत्तेदारांनाच दिला. त्यामुळे मूळ कामावर ती रक्कम खर्च झाली नाही. मनपाने सुरुवातीला ६ कोटींच्या मोबदल्यात सव्वा कि़ मी. रस्ता खोदण्याची परवानगी दिली. त्यानंतर ४४.३५ कि़ मी. रस्त्यांसाठी दुसरी, तर ११७.५८ कि़ मी. साठी तिसरी परवानगी दिली. रस्त्याच्या चौकातील भाग मशीनच्या साह्याने खोदण्यात येईल, असे मनपाने जाहीर केले होते. मात्र, कामगारांकडून रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. नागरिकांना होतोय त्रास... रिलायन्सच्या कंत्राटदाराचे काम कुठे चालू तर कुठे बंद आहे. कंत्राटदाराचे काम आता संपत आले आहे. अर्धवट कामाचा त्रास शहरवासीयांना होऊ शकतो. पालिकेने एकाच वेळी सर्व रस्ते खोदण्याची परवानगी दिली आहे. किती रस्ते खोदले जाणार आहेत. कोणत्या दिवशी त्याचे खोदकाम होईल, याची माहिती मनपाने जाहीर करणे गरजेचे आहे, अशी मागणी नगरसेवकांनी वारंवार केली. जलवाहिन्या फुटल्या, हायमास्टसह पथदिव्यांचे केबल कापले गेले. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केबल टाकून तातडीने खड्डे बुजविले जात नाहीत. त्यामुळे खड्ड्यात पडून अनेक नागरिक किरकोळ जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.
रिलायन्सचे २४ कोटी गुत्तेदारांच्या तिजोरीत!
By admin | Published: May 20, 2014 1:28 AM