- विकास राऊत
औरंगाबाद : अपघाताचा महामार्ग असलेल्या बीड बायपासच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. चार उड्डाणपूल त्या रस्त्यावर होणार आहेत. त्यामध्ये बायपासवर एमआयटी, संग्रामनगर, देवळाई चौक आणि जालना रोडवरील केम्ब्रिज स्कूल चौकाचा समावेश आहे. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम आहे.
कामाचे कंत्राट बांधकाम विभागाने जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चरला दिले असून, ३८३ कोटींतून ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रॉक्युरमेंट, कन्स्ट्रक्शन्स) या करारांतर्गत कंत्राटदाराला ते काम करावे लागणार आहे. मध्यवर्ती बिंदूपासून साडेसात मीटर रस्ता, त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा साडेसात मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंनी एकेक मीटरचे गटर असतील. १४ कि़ मी. रस्त्याचे काम काँक्रिटीकरणातून होईल. बीड बायपासवर तीन उड्डाणपूल असतील. जालना रोडवरील केम्ब्रिज स्कूल चौकातील पुलाच्या कामाचा यामध्ये अंतर्भाव केला आहे. साधारणत: अडीच वर्षांच्या काळात या रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. बांधकाम विभागाने जीएनआय या संस्थेला वर्कआॅर्डर दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संचिकांचा प्रवास असा एमएसआरडीसीकडे बीड बायपासच्या रुंदीकरणाची जबाबदारी २०१५ मध्ये देण्याचे ठरले. या संस्थेने सर्व्हे करून डीपीआर करण्याची तयारी करतात. डिसेंबर २०१५ मध्ये एनएचएआय त्या रस्त्याचे ३७९ कोटींतून रुंदीकरण करून उड्डाणपूल करणार असल्याची घोषणा केंद्र शासनाने केली. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एनएचएआयच्या हस्तांतरण वादात बांधकाम विभागाकडे रस्त्याची मालकी राहिली. एनएचएआयने चार वर्षांनंतर त्या रस्त्याचे रुंदीकरण करणे जमणार नाही असे सांगून अंग काढून घेतले. महापालिकेला दोन वॉर्डांच्या हद्दीपर्यंतचा बीड बायपास विकसित करता आला नाही. परिणामी आॅक्टोबर २०१८ मध्ये बांधकाम विभागाने शासनाकडे ११० कोटींचा प्रस्ताव पाठविला. रस्त्याची गरज पाहून आॅक्टोबर २०१९ मध्ये ३८३ कोटींची मंजुरी मिळाली. फेबु्रवारी २०२० मध्ये माती परीक्षणाचे काम सुरू झाले. या पाच वर्षांत शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी त्या रस्त्याने घेतले.
देवळाई चौक, संग्रामनगर, एमआयटी येथे उड्डाणपूल बायपासवर तीन उड्डाणपूल होणार आहेत. यामध्ये देवळाई चौकात, संग्रामनगरच्या पुलानजीक तसेच एमआयटीसमोर उड्डाणपुलांचा समावेश आहे. त्यातील एमआयटीसमोरील उड्डाणपुलात सध्या तांत्रिक अडचण आहे. भूसंपादन व इतर बाबींमुळे तेथील पुलाचे डिझाईन अजून तयार केलेले नाही. केम्ब्रिज चौकातील डिझाईन तयार झाले आहे. देवळाई चौकातील पूल कसा असेल, हे डिझाईन केले जात आहे. संग्रामनगर येथील पुलाचेही डिझाईन केले जाते आहे. पुलांच्या लांबी-रुंदीबाबत निर्णय होणार आहे.
३८३ कोटींतून ईपीसी करारावर कंत्राट ३८३ कोटींतून १४ कि़ मी. रस्त्यांचे कोणते काम करणार, किती उड्डाणपूल बांधणार. भुयारी मार्गांचा काही समावेश आहे काय? शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पूल बांधणार की नाही. देवळाई चौकातील वाहतूक कोंडी आणि शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणाबाबत तांत्रिकदृष्ट्या काय उपाययोजना केल्या आहेत. या सगळ्या बाबींबाबत सूत्रांनी सांगितले, ईपीसी (इंजिनिअरिंग, प्रॉक्युरमेंट,कन्स्ट्रक्शन्स) या करारांतर्गत हे काम देण्यात आले आहे. कंत्राटदाराला ३८३ कोटींतच सगळे काम करून द्यावे लागणार आहे. यामध्ये पूर्ण कामाची जबाबदारी कंत्राटदारावरच असणार आहे. चार उड्डाणपुलांसह रुंदीकरणासाठी बांधकाम विभागाने जे निकष ठेवले होते, त्यानुसार काम केले जाणार आहे. केम्ब्रिज चौकातील पुलाचे डिझाईन तयार झाले आहे. इतर पुलांचे डिझाईनचे काम सुरू आहे.