औरंगाबाद : महापालिका जोपर्यंत स्वहिस्सा भरणार नाही, तोपर्यंत स्मार्ट सिटीसाठी असलेला पुढील निधीचा पुढचा टप्पा केंद्र सरकार देणार नाही, असे गेल्या महिन्यात सांगण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय दिल्लीत केंद्रीय उपसचिव कुणालकुमार यांची भेट घेतल्यामुळे २५० कोटींचा स्वहिस्सा भरण्यासाठी मनपाला एक वर्षाची मुदत मिळाली आहे.
प्रशासकांची दिल्ली वारी फळाला आली असून, आता मनपाला आगामी वर्षभरात स्वहिस्सा उभारण्याची तयारी करावी लागणार आहे. प्रशासक पांडेय यांनी स्मार्ट सिटीच्या कामांची माहिती कुणालकुमार यांना दिली. कुणालकुमार यांना महापालिकेची आर्थिक स्थिती कोरोनामुळे कोलमडल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी मार्च २०२२ पर्यंत महापालिकेला स्वहिस्सा भरण्याची मुभा दिली व केंद्र सरकार स्मार्ट सिटीसाठीचा पुढील निधी देईल, असे कुणालकुमार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच निधी मिळेल, असा विश्वास प्रशासक पाण्डेय यांनी व्यक्त केला.
पाच वर्षांत एक हजार कोटींची कामेपाच वर्षांत एक हजार कोटींच्या प्रकल्पांचे कामे करण्याचे नियोजन स्मार्ट सिटी अभियानात करण्यात आले आहे. त्यातील पाचशे कोटी रुपये केंद्र सरकार तर उर्वरित २५० कोटी राज्य व २५० कोटी महापालिकेचा हिस्सा आहे. केंद्र व राज्य शासनाने पहिल्या दोन टप्प्यांचा निधी दिला पण महापालिकेने आपला २५० कोटी रुपयांचा हिस्सा भरलेला नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारचे उपसचिव कुणालकुमार यांनी महापालिकेला सूचित केले होते.