छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून आजघडीला २० आजारांसाठी मदत केली जाते. यात आणखी पाच आजारांचा समावेश होणार आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यभरात ३०१ कोटींच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १३.५ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या शिवसेना वैद्यकीय राज्यप्रमुख रामहरी राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
या कक्षाने गेल्या २ वर्षं १ महिन्यामध्ये ३६,००० पेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना एकूण ३०१ कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्याची कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आरोग्यवारी तथा आरोग्य संवाद यात्रेचे राज्यात आयोजन करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या निधीच्या बाबतीत हलगर्जीपणा, गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांना ‘ब्लॅक लिस्ट’ केले जात असल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी हर्षदा शिरसाट, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे महानगरप्रमुख अजय महाजन, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कार्यालयप्रमुख मनोज वडगावकर यांची उपस्थिती होती.
किती मदत मिळते?विविध आजारांसाठी, शस्त्रक्रियांसाठी ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून मदत मिळते.
या २० आजारांना सध्या मिळते मदतकाॅकलिअर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुप्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदय रोग, डायलिसिस, कर्करोग-किमोथेरपी / रेडिएशन, खुब्याचे प्रत्यारोपण, नवजात शिशूचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, जळीत रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण.
या पाच आजारांना लवकरच मदतपायाची अँजिओप्लास्टी, सीबीएस सिंड्रोम, मणक्याची शस्त्रक्रिया, कानाच्या शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दुभंगलेले ओठ यांचा आगामी आठ दिवसांत समावेश होईल आणि उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळेल, असे राऊत म्हणाले.
जिल्हा समन्वयकांविषयी तक्रारीची गंभीर दखलएकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक कार्यालयात पूर्णवेळ बसत नाहीत. स्वाक्षरीसाठी गेल्यानंतर उद्या या, असे सांगितले जाते. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी होत आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा अहवाल सादर केला जाईल, असे राऊत यांनी सांगितले.