औरंगाबाद : याचिकाकर्त्या विद्यार्थिनीचा एमबीबीएस प्रथम वर्षाचा प्रवेश २७ नोव्हेंबरपर्यंत रद्द करू नये, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. बी.यू. देबडवार यांनी शुक्रवारी (दि.२०) दिले. महिला व बालविकास विभागाने २६ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून याचिकाकर्तीला ‘अनाथ’ असल्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घ्यावा, असेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
याचिकाकर्ती दिव्या अशोक सांगळे ही ४ वर्षांची असताना तिचे आई-वडील मरण पावले. परभणी येथील सामाजिक संस्थेने तिचा सांभाळ केला. १२ वी नंतर ती ‘नीट’ या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाली. अनाथ मुलांसाठीच्या एक टक्का समांतर आरक्षित कोट्यातून दिव्याला औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला. २० नोव्हेंबर २०२०ला तिला महाविद्यालयात प्रवेशासाठी बोलावले होते. मात्र, दिव्याकडे अनाथ असल्याचे प्रमाणपत्र नव्हते. २० नोव्हेंबर ही प्रवेशाची शेवटची तारीख होती. ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी सामाजिक भावनेतून याचिका दाखल करून वरील बाबी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या.