औरंगाबाद : जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून (सीएसटी) धावण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. दुसरीकडे नंदीग्राम एक्स्प्रेस केवळ नांदेडपर्यंतच चालविण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची रेल्वे आहे. एका दिवसात मुंबईला जाऊन आपले काम करून याच रेल्वेने परत येण्यासाठी ही रेल्वे उपयुक्त आहे. ही रेल्वे सुरुवातीला मुंबईपर्यंत (सीएसटी) धावत होती; परंतु पुढे जनशताब्दीची धाव ही दादरपर्यंत केली गेली. २०१५ मध्ये ही जनशताब्दी जालन्यापर्यंत वाढविण्यात आली. दादरवरून ये-जा करताना अनेक अडचणी येत असल्याने लोकांच्या सुविधेसाठी ही रेल्वे पुन्हा सीएसटीपर्यंत नेण्याची मागणी केली जात होती. अखेर त्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा सीएसटीपर्यंत नेल्यामुळे औरंगाबाद आणि जालन्याच्या नागरिकांना फायदा होईल. नंदीग्राम एक्स्प्रेस नांदेड ते नागपूरदरम्यान तोट्यात चालत असल्याने प्रशासनाने ही रेल्वे नांदेडपर्यंतच चालविण्याचा निर्णय घेतला. याचाही मराठवाड्याला फायदा होईल. असे असले तरी भोकर, हिमायतनगर, किनवट, अदिलाबादच्या नागरिकांची गैरसोय होईल, असे स्वानंद सोळंके यांनी सांगितले. जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून आणि नंदीग्राम एक्स्प्रेस केवळ नांदेडपर्यंतच चालविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याचे पत्र प्राप्त झाल्याचे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी सांगितले.
कार्यालयीन पत्र, अधिक माहिती नाहीया दोन्ही रेल्वेसंदर्भातील पत्र कार्यालयीन आहे. त्याविषयी अद्याप काही अधिक माहिती प्राप्त नाही, त्यामुळे काय निर्णय झाला, हे आता सांगता येणार नाही, असे ‘दमरे’च्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.