औरंगाबाद : दिवसेंदिवस लम्पी या चर्मरोगाने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत असून जिल्ह्यातील पशुपालक हादरून गेले आहेत. प्रामुख्याने औरंगाबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव आणि कन्नड या पाच तालुक्यांतील बाधित १३ जनावरे दगावली आहेत. दरम्यान, शासनाने पशुपालकांना दिलासा दिला असून या रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची तरतूद केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६० जनावरे या आजाराने बाधित झालेली आहेत.
या रोगाचा सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यात प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर आतापर्यंत जवळपास २१ जिल्ह्यांत हा रोग पसरला असून बाधित पशुधन मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे पशुपालक हताश झाले आहेत. मात्र, पशुपालकांना दिलासा देण्यासाठी शासनाने भरीव मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
लम्पी या रोगामुळे जनावराचा मृत्यू झाल्यास दुभत्या जनावरांसाठी (गाय, म्हैस) ३० हजार रुपये अर्थसहाय मिळेल. एका कुटुंबातील ३ जनावरांपर्यंत हे अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. बैलाचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपये दिले जाणार असून एका कुटुंबातील तीन बैलांपर्यंत हे अर्थसाहाय्य्य दिले जाणार आहे. वासराचा मृत्यू झाल्यास १६ हजार रुपये दिले जातील. एका कुटुंबातील सहा वासरांपर्यंत ही मदत मिळणार आहे. त्यासाठी पशुपालकांनी लम्पी रोगामुळे जनावराचा मृत्यू झाल्यास तत्काळ अथवा दुसऱ्या दिवशी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात, संबंधित पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, ग्रामपंचायती देणे गरजेचे आहे. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी अथवा सहायक पशुधन विकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, दोन स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पंचनामा करून तो लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचे त्याच दिवशी देणे गरजेचे आहे. हे चिकित्सालय जिल्हास्तरीय समितीला पंचनामा सादर करेल.
जिल्हास्तरावर पाच सदस्यांची समितीमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहायक आयु पशुसंवर्धन (तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय), सहायक आयु. पशुसंवर्धन (जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय) या अधिकाऱ्यांची अर्थसहाय मंजुरीसाठी समिती गठित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील लम्पी आजाराची सद्य:स्थितीएकूण बाधित गावे- ९६बाधित गावांच्या ५ किमी परिघातील गावे- ४४६बाधित गावांतील पशुधन- ७८०२८बाधित पशुधन- ५६०बाधित दगावलेले पशुधन- १३बाधित गावांच्या ५ किमी परिघातील पशुधन- २३४०१२आजपर्यंत लसीकरण झालेली जनावरे- २९७३७