वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीत जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शहर बससेवा सुरू झाल्याने औद्योगिक क्षेत्रात ये-जा करणाऱ्या कामगार व प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. बससेवा सुरू झाल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे व काळी-पिवळी चालकांकडून होणारी आर्थिक लूट थांबणार असल्याने प्रवाशांत समाधानाचे वातावरण आहे.
वाळूज एमआयडीसीतील कारखान्यात दररोज शहर व ग्रामीण भागातून हजारो कामगार कामासाठी ये-जा करीत असतात. याशिवाय वाळूज महानगरातील नागरिकही खरेदी व विविध कामांसाठी शहरात ये-जा करीत असतात. दोन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करीत औद्योगिक क्षेत्रातील शहर बससेवा बंद करण्यात आली होती. बससेवा बंद करण्यात आल्यामुळे कारखान्यात कामासाठी येणाऱ्या कामगारांनी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षा व काळी-पिवळीतून प्रवास सुरू केला होता. बससेवा बंद असल्याचा फायदा घेत अॅपे व काळी-पिवळीचालक कामगार व प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे वसूल करीत असल्याने प्रवाशांची आर्थिक लूट सुरू होती. कडक निर्बंधाचे कारण दर्शवून अॅपे व काळी-पिवळीचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारत असल्याने कामगार व प्रवासी चांगलेच अडचणीत सापडले होते. बससेवा बंद असल्याने शहर व ग्रामीण भागातून येणाऱ्या तसेच एकाच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी सहकामगारांना दुचाकीत अर्धे-अर्धे पैसे देऊन इंधन टाकण्याच्या अटीवर दुचाकीवरुन ये-जा करण्यास सुरवात केली होती. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून होणारी लूट व वेळेवर कामावर पोहोचता येत नसल्याने अनेक कामगारांनी दुचाकी शेअरींगला प्राधान्य देत सहकामगाराच्या दुचाकीवरून ये-जा सुरू करण्यास पसंती दिली होती.
चौकट..
शहर बससेवेचे भाडेही कमी
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या तुलनेत शहर बससेवेचे भाडेही कमी असल्याने बहुतांश कामगार व प्रवासी बसने ये-जा करण्यास प्राधान्य देत आहेत. बससेवा सुरू झाल्याने काळी-पिवळी व अॅपेचालकाकडून होणारी आर्थिक लूट थांबणार असल्याच्या प्रतिक्रिया शंकर सोनवणे, अरुण निळेकर, स्वामी काळे, सुधीर साळुंके, भीमराव शेजवळ या कामगार व प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
फोटो ओळ- पंढरपुरातील तिरंगा चौकात शहर बसची प्रतीक्षा करताना प्रवासी दिसत आहे.
---------------------