छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथे मंगळवारी रात्री एका टोळक्याने मंदिरात जाऊन आरती बंद करण्याचे सांगितल्यानंतर झालेल्या वादानंतर एका तरुणाला मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच दोन भिन्न धर्मीय समाजांचे दोन गट आमने-सामने रस्त्यावर आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. एकाबाजूने दगडफेकीचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.
चिकलठाणा येथील दोन भिन्न धर्मांची प्रार्थनास्थळे जवळजवळ आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या महिला मंदिरात आरती करत असताना दुसऱ्या समुदायाचे काही तरुण आले आणि त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी राजू रोटे, कृष्णा नागे यांना मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले तसेच गुप्ता नावाच्या महिलेलाही यावेळी समुदायातील लोकांनी धक्काबुक्की केल्याने ती जखमी झाल्याचे कळते. परिसरातील दोन्ही समुदायांचे जमाव रस्त्यावर समोरासमोर आले. दोन्ही गट परस्परविरोधी घाेषणा देत होते. तणाव निर्माण झाल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नवनीत काँवत, उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात, पोलिस निरीक्षक गौतम पातारे, संदीप गुरमे, राजेश यादव यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, एसआरपीचे जवान आणि अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी सर्वप्रथम जमावावर सौम्य लाठीमार केला. मग रस्त्यावरील जमाव गावातील गल्ल्यांमध्ये गेला. त्यानंतर काही गल्ल्यांत प्रत्येकी १० पोलीस आणि एक फौजदार तैनात करण्यात आले. गल्लीतील लोकांना आपापल्या घरातून बाहेर न पडण्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी तरुणाला एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नेऊन त्याची तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दीड वर्षांपासून धुसफूसचिकलठाणा येथील दोन्ही धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांवरून उभय समुदायांतील तरुणांमध्ये धुसफूस सुरू आहे. दीड वर्षांपूर्वी यावरून भांडण झाले होते. मात्र, गावांतील ज्येष्ठ मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेतली होती. आता रमजान महिन्याच्या पहिल्याच रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला.
परिस्थिती नियंत्रणाखाली, अफवांवर विश्वास ठेवू नकाचिकलठाणा मिनी घाटीजवळ दोन गटांमध्ये उद्रेक झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. चिकलठाणा येथे शांतता आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेत जे लोक सहभागी होते, त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नका.-नवनीत काँवत, पोलिस उपायुक्त