औरंगाबाद : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी पाणी सोडण्यावर तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार होता; परंतु तीन दिवसांनंतरही निर्णयाअभावी वरच्या धरणातील पाण्याचे सीमोल्लंघन लांबले आहे. राजकीय दबावापोटी हा निर्णय लांबविला जात असल्याची चर्चा आहे.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ आॅक्टोबर रोजी नगर, नाशिक, गंगापूर आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मुळा, भंडारदरा, दारणा या धरणांतील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन जायकवाडीत पाणी सोडण्याबाबत चर्चा झाली.जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार जायकवाडी धरणाच्या वर असलेल्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठा तसेच वापरलेले पाणी यांची बेरीज करून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती जायकवाडी धरणात १७२ दलघमी म्हणजे ७ टीएमसी एवढ्या पाण्याची तूट असल्याचे समोर आले. त्यामुळे किमान ७ टीएमसी पाणी वरच्या धरणांतून जायकवाडीत सोडणे अपेक्षित आहे. कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचा तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार होता; परंतु तीन दिवस उलटूनही यावर काही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जायकवाडीला येणाºया पाण्याची वाट बिकट झाल्याचे दिसते.नगर जिल्ह्यातील शेतकºयांनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध केला आहे. शिवाय या जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिला आहे़ कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी न देण्याचा ठरावदेखील या सभेत करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय दबावामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय लांबवला जात असल्याची चर्चा सुरूआहे.आणखी दोन दिवसजायकवाडीत वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात अद्याप काही निर्णय झालेला नाही. आगामी दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय होईल,अशी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.
राजकीय दबावापोटी पाण्याचे सीमोल्लंघन लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 11:41 PM
औरंगाबाद : मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून १७२ दलघमी पाणी सोडण्यावर तीन दिवसांत निर्णय घेतला जाणार ...
ठळक मुद्देसमन्यायी पाणीवाटप : तीन दिवसांनंतरही निर्णय नाही