औरंगाबाद : उकाड्याने हैराण झालेल्या औरंगाबादकरांना रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने दिलासा मिळाला. मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला होता. दिवसभर उन्हाने अंगाची लाही लाही होत असताना रात्रीही उकाड्याने नागरिक त्रस्त होते. रविवारी सायंकाळी आकाशात काळे ढग जमा होऊन वातावरणात बदल झाला. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पावसाचे थेंब पडू लागले. काही क्षणातच जोराचा पाऊस सुरू झाला. तासभर पावसाच्या सरी कोसळल्या. लेबर कॉलनी, शहागंज, सिटीचौक, टी. व्ही. सेंटर, गुलमंडी, औरंगपुर्यासह शहरातील वेगवेगळ्या भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. मृग नक्षत्राला अजून अवकाश असला तरी अधूनमधून अवकाळी पाऊस शहर आणि परिसरात हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी खते, बियाणांची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे चित्र जुना मोंढा परिसरात पाहायला मिळत आहे. मागील वर्षी मराठवाड्याने भीषण दुष्काळाचा सामना केला. त्यानंतर यंदा गारपिटीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले. यंदा तरी चांगला पाऊस व्हावा, पिके चांगली यावीत, अशी अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे. शहरी भागात राहणार्या नागरिकांना जायकवाडी धरणाची चिंता आहे.
रिमझिम पावसाने मिळाला दिलासा
By admin | Published: May 19, 2014 1:27 AM