वाळूज महानगर: वाळूज महानगर परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे वाहनधारक, व्यवसायिक व प्रवाशांची गैरसोय झाली. गुरुवारनंतर पुन्हा शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. शनिवारी दुपारपर्यंत कडक ऊन होते. मात्र, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन वारा वाहायला सुरुवात आभाळात ढग दाटून आले. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. जवळपास २५ मिनिटे रिमझिम पाऊस सुरु होता. रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण व विजेचा कडकडाट सुुरुच होता.
अचानक आलेल्या या पावसामुळे व्यवसायिकांची चांगलीच धांदल उडाली. कामाहून सुटलेल्या कामगारांना भिजत घर गाठावे लागले. यावेळी दुचाकीस्वार व प्रवाशांना चौकातील हॉटेल, शेडचा आधार घ्यावा लागला.
अनेकांनी भिजत घर जवळ केले. पावसामुळे रस्त्यावरील ये-जा करणाऱ्यांची वर्दळ मंदावल्याने नेहमी गर्दीने गजबजलेले रस्ते निर्मनुष्य झाल्यासारखे दिसत होते. या रिमझिम पावसात लहान मुलांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.