परभणी: शहरातील जिल्हा परिषदेच्या कोविड केअर सेंटरमधून चोरून आणलेले रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात विकताना जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारिकेसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्या ताब्यातून २ रेमडेसिविर इंजेक्शन, रोख रक्कम व २ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे इंजेक्शन काळ्या बाजारात १५ ते २० हजार रुपयांना विकले जात आहे. या पार्श्वभूमीवर परभणी येथे हा काळाबाजार सुरू असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सपोनि व्यंकटेश आलेवार यांनी सापळा रचला. त्यानुसार पोलीस शिपाई संतोष सानप यांना बनावट ग्राहक म्हणून एका व्यक्तीला या इंजेक्शनची विचारणा केली असता त्याने १५ हजार रुपयांना १ या प्रमाणे ३० हजार रुपयांना २ इंजेक्शन देण्याचे कबूल केले. त्यानंतर संबधिताने पोलीस कर्मचारी सानप यांना शहरातील नांदखेडा रोड भागात येण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.
मंगळवारी दुपारी ३.१० च्या सुमारास सदरील व्यक्ती बेलेश्वर मंदिराजवळ पाई आला. त्यानंतर इंजेक्शनविषयी बोलू लागला. यावेळी पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दत्ता शिवाजी भालेराव (नर्सिंग स्टाफ, डेंटल कॉलेज, परभणी) असे सांगितले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ २ रेमडेसिविर इंजेक्शन व १ मोबाईल आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन आपण जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका निता केशव काळे हिच्याकडून प्रत्येकी १२ हजार रुपयास १ विकत घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी परिचारिका निता काळे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने जिल्हा परिषदेच्या कोविड केअर सेंटरमध्ये कर्तव्यावर असताना ७ रेमडेसिविर इंजेक्शन चोरल्याची कबूली दिली. तिच्या रुमची झडती घेतली असता रोख ७५ हजार रुपये व १ मोबाईल आढळून आला. याबाबत औषधी निरीक्षक बळीराम मरेवाड यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.