औरंगाबाद : रस्त्यावरील हातगाडीवर, टपरीमध्ये किंवा हॉटेलमध्ये मिळणारे भजे खूपजण चवीने खात असतात. काही ठिकाणचे भजे तर खवय्येप्रिय आहेत. मात्र, सावधान...! कारण, हे भजे तळण्यासाठी एकदाच कढईत टाकलेल्या खाद्यतेलाचा वापर वारंवार केला जातो. असे तळलेले पदार्थ खाण्यात आले तर याचा शरीरावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात होते. यामुळेच अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे यांनी खाद्यतेलाचा पुनर्वापर करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
एकाही विक्रेत्यावर कारवाई नाहीखाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तळले तर ते खराब होते. खाद्यतेलात वारंवार पदार्थ तळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश खुद्द मंत्र्यांनी शहरात बैठक घेऊन दिले असताना, अजूनही अन्न व औषध प्रशासनाने एकाही विक्रेत्यावर कारवाई केलेली नाही. या संदर्भात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विक्रेत्यांची आम्ही बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. आता खाद्यतेल २५ डिग्रीपेक्षा जास्त तापले की नाही, हे तपासणीसाठी प्रशासनाकडे यंत्र आले आहे. लवकरच या यंत्राद्वारे तपासणी होईल.
तळण्यासाठी स्टेनलेस स्टीलचेच भांडे हवेअधिकाऱ्यांनी सांगितले की, तळण्यासाठी लोखंडी कढईऐवजी स्टेलनेस स्टीलची कढई वापरा. तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा, जेणेकरून तेलामधून धूर निघू नये.
तळलेले तेल बायोडिझेल कंपन्यांना द्या, पैसे मिळवाहॉटेलवाल्यांकडून तळलेले खाद्यतेल नवी दिल्ली येथील केंद्रीय अन्नसुरक्षा व मानदे प्राधिकरण यांची मान्यता असलेल्या बायोडिझेल उत्पादक कंपनीला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यांची औरंगाबादेतही एजन्सी आहे. त्या एजन्सीचे कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांकडे जाऊन तळलेले तेल खरेदी करतात. सध्या पुनर्वापर केलेले तेल एजन्सी ३६ रुपये लिटरने खरेदी करते व बायोडिझेल कंपनीला देते. यामुळे हॉटेल व्यावसायिकांनाही चार पैसे मिळू लागले आहेत.
तेलसाठ्याची नोंद ठेवतो कोण ?रोज ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेलाचा वापर करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना तेलसाठ्याच्या नोंदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वापरून किती तेल शिल्लक राहिले, वापरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा वापरलेले तेल कोणत्या नोंदणीकृत बायोडिझेल उत्पादकांना दिले, यासंबंधीच्या नोंदी ठेवाव्या लागतात. मात्र अशा नोंदी कमी व्यावसायिक ठेवतात; कारण अजून प्रशासनाकडून नोंदीची तपासणी करण्यात आली नाही.
... तर होऊ शकतात हे आजारवारंवार तळलेल्या तेलातील पदार्थ खाण्यात आले की, लठ्ठपणा वाढतोे. रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हृदयात ब्लॉकेज निर्माण होऊ लागतात. एवढेच नव्हे तर हृदयविकाराचा झटका येण्यापासून ते कॅन्सरपर्यंतचा धोका असतो.- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ