छत्रपती संभाजीनगर : माणसांसह पक्ष्यांसाठी घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजाची विक्री करताना कोणी आढळल्यास गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून थेट अटक करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पतंग विक्रेत्यांना दिला आहे.
संक्रांतीची चाहूल लागताच सर्वांनाच पतंगाचे वेध लागतात. पतंग कापण्याच्या इर्षेपोटी अनेकांकडून घातक असा नायलॉन म्हणजेच चायनीज मांजाचा वापर केला जातो. या मांजाला घातक काच लावलेली असल्याने अनेक जण गंभीर जखमी होतात. गेल्या दोन महिन्यांमध्ये शहरात जवळपास सहा नागरिक यात गंभीर जखमी झाले. गतवर्षी यात अनेक पक्षी जखमी होऊन मृत्युमुखी पडले. उच्च न्यायालयानेदेखील याची गंभीर दखल घेत पोलिसांसह महानगरपालिकेला चांगलेच खडसावले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात शहरातील सर्व पतंग विक्रेत्यांची बैठक घेऊन मांजा विक्री न करण्याबाबत दम भरला.
थेट अटक करू, उडवताना आढळल्यासही कारवाईयापुढे सातत्याने पतंग विक्रेत्यांचे गोडाउन व दुकानांची तपासणी होणार आहे. पोलिस कधीही छापे टाकतील. कुठेही मांजा आढळल्यास या परिसरातील सर्व पतंग विक्रेत्यांची खोलवर चौकशी केली जाईल. गरज पडल्यास गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करून अटक केली जाईल, असा इशाराच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.
प्रत्येक दुकानात पोस्टर बंधनकारकमांजा विक्री व वापराच्या विरोधात पोलिसांनी तयार केलेले पोस्टर प्रत्येक विक्रेत्याला दुकानात लावणे यापुढे बंधनकारक असेल. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत हे पोस्टर लावण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच कुठेही मांजा विक्री व वापर आढळल्यास सामान्य नागरिकांनी गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या संपर्क क्रमांकावर ९२२६५१४०१४ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हे शाखा निरीक्षक संदीप गुरमे, विशेष शाखा निरीक्षक अविनाश आघाव उपस्थित होते.