लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गर्भामध्ये वाढणाऱ्या अर्भकाला तंत्रज्ञानाच्या साह्याने बाहेर काढून त्यावर उपचार केले जातात आणि पुन्हा त्यास आईच्या गर्भात टाकले जाते. अनेक देशांत हे शक्य झाले आहे. भारतात हा उपचार महागडा ठरत असल्याने त्याचे अत्यल्प प्रमाण असल्याचे ज्येष्ठ बालरोग शल्यचिकित्सक डॉ. सुभाष दलाल यांनी सांगितले.शहरात पार पडलेल्या बालरोग शल्यचिकित्सकांच्या परिषदेत डॉ. दलाल यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. डॉ. दलाल म्हणाले, आजारी बालकांवर एखादी शस्त्रक्रिया करून उपचार होऊ शकतो, हे ६० वर्षांपूर्वी लोकांना पटणारे नव्हते.लोकांना ते पटवून सांगावे लागत असे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज कॅन्सरसारख्या आजारावर उपचार शक्य झाला आहे. पूर्वी डॉक्टर केवळ रुग्णांना पाहूनच उपचार करीत असत. आजारांच्या निदानासाठी आज एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफीसारख्या तंत्रज्ञानाचा आधार मिळत आहे. पूर्वी लोक डॉक्टरांना देव मानायचे.आता असे राहिले नाही. उपचारात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून डॉक्टरांना मारहाणीच्या घटना होतात. रुग्ण डॉक्टरांच्या विरोधात दावे करतात. त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित चाचण्यांद्वारे आजाराचे निदान केले जातात. परंतु त्यातून रुग्णांवर आर्थिक भुर्दंड पडतो, हेदेखील तेवढेच खरे आहे, असे डॉ. दलाल म्हणाले.
गर्भातून अर्भक बाहेर काढून उपचार शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 1:12 AM