औरंगाबाद : महापालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय कुरघोडीचा एकाच आठवड्यात जिल्हाधिकारी एन.के. राम यांना अनुभव आला असून, त्यांनी शासनाकडे मनपाचा पदभार सोडण्यासाठी विनंती केल्याची माहिती पुढे आली आहे. मनपा आयुक्तपदी शासनाने ज्यांची बदली केली आहे, त्यांनी तातडीने रुजू व्हावे, यासाठी जिल्हाधिकार्यांनीदेखील शासनाशी संपर्क केल्याचे वृत्त आहे.
मुळात जिल्हाधिकार्यांना पालिकेचा चार्जच नको होता. एका प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांना प्रशिक्षणासाठी जायचे होते, त्यामुळे त्यांनी शासनाकडे मनपाच्या पदभाराबाबत विनंती केली होती; परंतु शहरातील कचरा समस्येने विक्राळ रूप घेतले होते, त्यासाठी त्यांना शासनाने मनपा आयुक्तपदाची प्रभारी जबाबदारी दिली. तत्कालीन आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची तातडीने बदली केल्यानंतर पर्याय म्हणून जिल्हाधिकारी राम यांचे नाव पुढे आले. राम यांनी जिल्हा नियोजन समिती अनुदान विनियोग, महसूल वसुलीची कामे सांभाळून शहरातील कचर्याच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी नियोजन केले; परंतु कचर्याची विल्हेवाट १०० टक्के लागण्यासारखी परिस्थती निर्माण झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांची धावपळ सुरू आहे. मार्चअखेरीस डीपीडीसी, वसुलीच्या कामांचा व्याप आणि मनपा आयुक्त पदाची प्रभारी जबाबदारी सांभाळून ते झोननिहाय कचरा निर्मूलन आणि प्रक्रियेबाबत बैठक घेत आहेत, तसेच डम्पिंग आणि कचरा प्रक्रियेसाठी आढावा घेत आहेत. रविवारी त्यांनी पडेगाव, मिटमिटा, जयभवानीनगर, पुंडलिकनगर परिसरातील कचर्याच्या समस्येचा आढावा घेतला. ज्या परिसरात कचर्याची प्रक्रिया करण्यासाठी नागरिक स्वत: पुढाकार घेत आहेत, तेथील नागरिकांशी जिल्हाधिकारी संवाद साधत आहेत.
सोशल मीडियात अनेक नावांची चर्चा पािलका आयुक्तपदी कोण येणार याबाबत, सोशल मीडियातून अनेक अधिकार्यांच्या नावाची चर्चा आहे; परंतु अजून तरी शासनाने आयुक्तपदाची जबाबदारी कुणाकडे द्यायची, हे निश्चित केलेले नाही. जिल्हाधिकारी राम यांचे पद मनपा आयुक्तांच्या पदापेक्षा मोठे आहे. त्यामुळे त्यांची वर्णी मनपावर लागेल, असे चित्र सध्या नाही; परंतु सगळे काही शासनाच्या हाती असल्यामुळे आयुक्तपदी कुणाची वर्णी लागते, याकडे लक्ष आहे.