औरंगाबाद : मराठा समाजाला यापूर्वी ‘एसईबीसी’ आरक्षण दिले तेव्हा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटीलमराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते. मात्र, हे आरक्षण टिकले नाही. आता ‘ओबीसी’तून आरक्षण मिळावे, यासाठी समाज मागणी रेटत असताना पुन्हा त्यांना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष करण्यात आले. त्यांची या समितीतून हकालपट्टी करावी, अशी मागणी झुंजार छावा संघटनेचे अध्यक्ष सुनील कोटकर पत्रकार परिषदेत शनिवारी (दि. १५) केली. दोन कार्यकर्त्यांतील संवादाची जुनी ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल करण्यामागेही चंद्रकांत पाटीलच असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
कोटकर म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात समाजाचे कार्यकर्ते काम करीत आहेत. मराठा समाजाला फडणवीस सरकारने दिलेले ‘एसईबीसी’ हे आरक्षण टिकले नाही. त्यावेळी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. आताही त्यांनाच अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांनी मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्याचे काम केले. यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीतून हकालपट्टी करावी, अशी संघटनेची मागणी आहे.
चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दोन कार्यकर्त्यांची तीन वर्षे जुनी ‘ऑडिओ क्लिप’ मुद्दाम व्हायरल करण्यात आली. ही ‘क्लिप’ आता व्हायरल करण्यामागे चंद्रकांत पाटीलच असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘क्लिप’मध्ये संवाद साधणारे दोन कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यासोबत निवडणुकीचा प्रचार करीत होते. यामुळे हा संशय असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, असल्या घाणेरड्या राजकारणामुळे समाजासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यांनी पैसे दिल्याचा संवाद कार्यकर्त्यांचा क्लिपमध्ये होतो, यामुळे या ऑडिओ क्लिपची चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. या पत्रकार परिषदेला अरुण नवले, नीलेश ढवळे, कल्याण शिंदे, नंदू गरड, सचिन भाबट, आदींची उपस्थिती होती.