औरंगाबाद : बीडकीन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय शिंदे यांनी मंगळवारी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर शहरातील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. वरिष्ठांच्या तणाव आणि दहशतीखाली शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला आहे. त्यामुळे पैठणच्या गटविकास अधिकाऱ्याला तत्काळ हटवा अन्यथा गुरुवारपासून जिल्ह्यातील ग्रामसेवक कामकाज बंद ठेवतील असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेने दिला आहे.
ग्रामसेवक युनियनच्या शिष्ठमंडळाने जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांची भेट घेवून पैठणचे गटविकास अधिकारी कसा त्रास देत आहेत. हे निदर्शनास आणुन दिले. यावेळी उपस्थित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांना पैठणच्या गटविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सुचना उपाध्यक्ष गायकवाड यांनी दिल्या. त्यानंतर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी कवडे यांना निवेदन दिले. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुनिल भोकरे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनीही शिष्ठमंडळाच्या तक्रारी समजुन घेतल्या. भोकरे यांनी या प्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल असे सांगितले. तर कवडे यांनी ग्रामसेवकांनी केलेल्या आरोपांच्या पुराव्यांची मागणी करत त्याआधारे आरोपपत्र करुन चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांची भेट घेतली. त्यांनीही कारवाईचे आश्वासन दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष भीमराज दाणे यांनी सांगितले.
निवेदनात म्हटल्यानुसार, पैठण येथील गटविकास अधिकारी व्ही.डी.लोंढे हे वित्त आयोगातील निधी खर्च करण्यास, आराखडे मंजूर करण्यासाठी चौकशी करतात, पैसे दिल्याशिवाय बॅंकेतून पैसे काढण्याचे आदेश देत नाहीत तसेच आर्थीक मागणी पूर्ण न केल्यास काही ग्रामसेवकांना निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामसेवक दहशतीखाली काम करत असुन त्यांचा पदभार काढून त्यांची सीआयडी चौकशी करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर भीमराज दाणे व पुंडलिक पाटील यांच्या सह्या आहेत. शिष्टमंडळात सुरेश काळवणे, प्रविण नलावडे, शिवाजी सोनवणे, के. पी. जंगले, जी. व्ही. हरदे, अख्तर पटेल, रवी नाईक, राणुबा काथार, सुरेश सुरडकर, सखाराम दिवटे, ए. डी. चव्हाण, ए. आर. पवार, जे. बी. मिसाळ, ज्ञानेश्वर थोरे, बेबी राठोड, ए. बी. बनसोड आदी ग्रामसेवकांचा समावेश होता.