औरंगाबाद : शिवसेनेत पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजीचा भडका उडाला. आता जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंविरुद्ध थेट आजी- माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनीच शड्डू ठोकला. आमदार संजय शिरसाठ, माजी आ. प्रदीप जैस्वाल, अण्णासाहेब माने, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर विकास जैन यांच्यासह सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी जाहीर पत्रकार परिषद घेऊन दानवे यांची केवळ जिल्हाप्रमुखपदावरूनच नव्हे तर पक्षातूनच हकालपट्टी करा, अशी मागणी केली. दानवे यांनी पदाचा वापर करून चक्क पक्षच विकायला काढला आहे, असा आरोप या नेत्यांनी केला. पदाधिकाऱ्यांच्या या बंडामुळे सेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेनेने शुक्रवारी आयोजित केलेल्या गणेशयात्रा कार्यक्रमपत्रिकेत आ.शिरसाट यांच्यासह माने, जैस्वाल, त्रिवेदी यांची नावे नसल्याचे औचित्य साधून पत्रकार परिषदेत दानवे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. दानवे हे समांतर शिवसेना चालवीत असून त्यांनी पक्ष विक्रीला काढला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे १८ सप्टेंबर रोजी दानवे यांच्या हकालपट्टीची मागणी करणार असल्याचे सांगून आ.शिरसाट म्हणाले, शिवसेनेत काही वर्षांपासून संघटनेचे पद मिळाले की, जहागिरी मिळाल्याच्या तोऱ्यामध्ये पदाधिकारी वागतायेत. त्यामुळे संघटनेचे मोठे नुकसान होत आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड नगरपालिकांमध्ये पक्षाला पराभवाचा फटका बसला. जिल्हा परिषद ताब्यातून गेली. वैजापूर, औरंगाबाद मध्य, गंगापूर विधानसभा हातून निसटल्या. ही पक्षाची गळती पक्षाचे दुकान केल्यामुळे लागली आहे. वरिष्ठांच्या कानावर अनेकदा हे प्रकरण घातले. पक्ष व्यावसायिक करून गटातटांच्या राजकारणाला अंबादास दानवे हे जबाबदार आहेत. पदाधिकाऱ्यांचे अस्तित्व संपविण्याचे राजकारण ते करीत आहेत. परंतु आता गटातटांच्या राजकारणाचा शेवट झाला पाहिजे. बजाजनगर सरपंच, सातारा-देवळाई मनपा निवडणुकीत गटबाजी करून माझ्या अस्तित्वाला तडा दिला. माझ्या मतदारसंघात कार्यक्रम आणि त्यात माझेच नाव नाही. माझ्यामुळे पक्ष चालला आहे, अशी गैरभावना दानवे यांची आहे. त्यांची हुकूमशहाची भूमिका संघटनेला परवडणारी नाही. स्वत:च्या हितासाठी ते पक्षाचे नुकसान करीत आहेत. देवगिरी बॅँकेत गरज नसतांना पॅनल उभे करण्याचा प्रयत्न म्हणजे पदाधिकारी आणि मला त्रास देण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे करण्यात येईल. हा मोठा विषय नाहीखा.चंद्रकांत खैरे म्हणाले, हा मोठा विषय नाही. थोड्याफार कुरबुरी होत असतात. सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. पक्षातील ज्येष्ठ या नात्याने स्थानिक पातळीवर संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत सर्वांची बैठक घेऊन सर्वांचे मन जुळविण्याचा प्रयत्न करील. नसता पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे सर्वांना घेऊन जाईल. यातून चर्चा करून मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. आपल्या मर्यादेत राहावे....आ.शिरसाट यांनी व्यक्त केलेली खंत योग्य आहे. पक्ष सर्वानुमते चालतो. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लपूनछपून होत आहेत. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत वागले पाहिजे. अनेकांना पक्षात काम करण्याची इच्छा राहिलेली नाही. शेवटी पक्ष महत्त्वाचा आहे, असे माजी आ.प्रदीप जैस्वाल म्हणाले.पक्षापेक्षा कोणी मोठा नाहीपदाधिकारी कुणीही असो, चौकटीत राहून काम केले पाहिजे. संघटना मोठी करण्यासाठी पदाधिकारी असतात. त्यासाठी प्रत्येकांची नावे कुठल्याही कार्यक्रमात असावीत. गटबाजी आणि द्वेष भावनेमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असे सहसंपर्कप्रमुख तथा माजी आ.अण्णासाहेब माने म्हणाले.समांतर पक्ष चालवितातसमांतर शिवसेना चालविण्याचा दानवे यांचा प्रयत्न आहे. माझ्या कार्यक्षेत्रातील निराधार योजनेवर संतोष कारले यांची नियुक्ती केली. तसेच बनोटीत न राहणारा संदीप चौधरी त्या योजनेवर सदस्य म्हणून नियुक्त केला, असे ग्रामीण जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी म्हणाले.
सेनेत दानवे हटाव
By admin | Published: September 10, 2016 12:20 AM