पैठण: रोजगार सेवकांचे चार महिन्यांचे मानधन पंचायत समितीला वर्ग झालेले असतानाही रोजगार सेवकांना मानधन देण्यास पंचायत समिती प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत रोजगार सेवकांनी आज पैठण पंचायत समिती कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. गेल्या सात महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आल्याची व्यथा तालुक्यातील रोजगार सेवकांनी यावेळी मांडली.
महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवर कार्यरत असलेल्या रोजगार सेवकांना गेल्या एप्रिल महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. यापैकी एप्रिल ते ऑगस्ट अशा चार महिन्यांचे मानधन पैठण पंचायत समितीला शासनाने वर्ग केलेले आहे. मात्र, मानधन देण्यास पंचायत समिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा रोजगार सेवकांचा आरोप आहे. तसेच पैठण तालुक्यात रोजगार हमीच्या कामावर ११० रोजगार सेवक कार्यरत आहेत. रोजगार हमी योजनेवर काम करत असताना कोणत्याही सुविधा त्यांना पुरविल्या जात नाहीत. सहा सहा महिने मानधन मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दिले जाणारे मानधन ग्राम रोजगार सेवकांच्या खात्यावर न देता ते ग्रामपंचायतीच्या खात्यावर दिले जात असल्याने रोजगार सेवकांमध्ये नाराजी आहे. या सर्व प्रश्नाकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी उपोषण करण्यात आले.
या उपोषणात शिवाजी गाडे, बापूसाहेब पवार, अशोक दिलवाले , अण्णा नजन, ज्ञानेश्वर कणसे, रमेश खरात, भाऊसाहेब काकडे, तुकाराम नरवडे, भरत गायकवाड, शिवाजी तांगडे, बिभीषण चव्हाण, प्रदीप गायकवाड, कृष्णा दौंड, विठ्ठल गरड, भागचंद वाघ, मुकुंद रेपाळे, योहान नरवडे, दत्ता सोनवणे, भीवराज यादव, एकनाथ चांदणे, दशरथ भवर, तुकाराम बोधणे, बापुराव लेंडे, संजय रोडगे, कृष्णा राजगुरू, गणेश कुटे,दत्तात्रय बाबर, संतोष जावळे, नवनाथ राठोड, अनिल मंडलिक, सचिन फासाटे, तुकाराम तांबे, विठ्ठल ढोले, कृष्णा वीर, दिनकर मापारी, योगेश मडके, सुनील मलपुरे, विलास थोरात, गुलाम शेख आदी रोजगार सेवक सहभागी झाले होते.