औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरूवारी अचानक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची क्रांतीचौकात गाडी अडवून त्यांच्यावर ‘संभाजीनगर नामकरण करा नाहीतर खुर्ची खाली करा’ या आशयाची पत्रके भिरकावून निषेध आंदोलन केले.
२६ जानेवारीपर्यंत जिल्ह्याचे नामकरण संभाजीनगर करावे, असे अल्टीमेटम मनसेने दिले होते. त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. त्यानुसार आज गुरूवारी गनिमी काव्यानुसार अचानक जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनाम गुलाटी, संदीप कुलकर्णी आदींनी क्रांतीचौकात शिवसेना नेते खैरेंची गाडी अडवून त्यांच्यावर पत्रके भिरकावली.
हा सगळा प्रकार सुरू असतांना दाशरथे व पदाधिकारी पुर्वाश्रमीचे शिवसैनिक असल्यामुळे खैरेंनी सुरूवातीला हा प्रकार मनावर घेतला नाही. परंतु घोषणाबाजी देत मनसे आक्रमक होताच दाशरथे आणि खैरेंमध्ये तु-तु-मैें-मैं झाली. यामुळे थोड्या काळासाठी तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेत सदरील प्रकार थांबविला.