छत्रपती संभाजीनगर : मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अजिंठा वसतिगृहाची उभारणी केली होती. या वसतिगृहाच्या जुन्या स्मृती जतन करुन नुतनीकरणाचे काम गुणवत्तापुर्ण करु, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी व्यक्त केला.
मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या वसतिगृह नुतनीकरण कामाचा आरंभ भिक्खु संघाच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. याप्रसंगी कार्यकारी अभियंता अशोक येरेकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वसतिगृहाची निर्मिती केली होती. या वसतिगृहाची इमारत जीर्ण झाल्याने नुतनीकरणाचा प्रस्ताव प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार शासनाने २.१५ कोटी रुपये मंजूर केले असून नुतनीकरण कामासाठी निधी कमी पडला, तर शासनाकडून आणखी रक्कम आणण्यासाठी प्रयत्न करेन. यावेळी भदन्त बोधीपालो महाथेरो यांनी ‘पीईएस’च्या विकासासाठी प्रत्येक आंबेडकरी अनुयायाने आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. शिवाजी डोळसे यांनी केले, तर मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. राठोड यांनी आभार मानले. याप्रसंगी भदन्त डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भिक्खू करुणानंद थेरो, भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, भिक्खू बोधीरत्न थेरो, भिक्खू मुदिता थेरो, भिक्खूनी धम्मदर्शना थेरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कांबळे, कनिष्ठ अभियंता होळकर, कंत्राटदार सुखदेव दाभाडे, पीईएस शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी सुर्यवंशी, डॉ. प्रमोद दुथडे, माजी प्राचार्य डॉ. बी.सी. घोबले, रतनकुमार पंडागळे, ॲड. एस.के. बोर्डे, व्ही. के. वाघ यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.