मुखेड: शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या ६ शाळा खाजगी मालकीच्या इमारतीत भरतात़ या इमारतींचे सुमारे २००५ पासूनचे २५ लाखांचे भाडे रखडले आहे़ भाडे द्या, अन्यथा उपोषण करू असे म्हणण्याची वेळ घरमालकांवर आली आहे़ मुखेडमधील जि़प़च्या शाळा क्रमांक एकवर असल्याने विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे़ या शाळांना स्वत:च्या इमारती नाहीत़ त्या खाजगी इमारतीत भरतात़ जि़प़चे शिक्षण विभाग भाडे देण्यास हात आखडता घेत असल्याने अनेकवेळा भांडणाचे प्रसंग उद्भवले़ घरमालकांनी भाड्याची वेळोवेळी मागणी केली, मात्र शिक्षण विभागाकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही़ शहरातील सहा शाळा इमारतींचे २००५ पासूनचे भाडे थकित आहे़ भाड्याची रक्कम २५ लाखाच्या घरात जाते़ या संदर्भात जिल्हा परिषदेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार नारायण देशमुख, मैनाबाई चौहाण, जगन्नाथ अमृतवाड, माधव मुखेडकर यांनी केली़ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भाडे न मिळाल्यास २२ मे रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करू, असे निवेदन गटशिक्षणाधिकार्यांना दिल्याचे देशमुख यांनी सांगितले़ श्रीमती मैनाबाई चौहाण यांच्या इमारतीचे ७ लाखांचे भाडे थकले आहे़ नारायण देशमुख यांचे ४ लाख रुपये, जगन्नाथ अमृतवाड यांचे ४ लाख, व्यंकटी महाजन यांचे ४ लाख, जगन्नाथ कामजे यांचे ५ लाख रुपये भाडे थकले आहे़ भाडे न मिळाल्यास १६ जून रोजी शाळा भरू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले़ यासंदर्भात शिक्षणाधिकारी मडावी, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही़ (वार्ताहर)
जि़प़शाळा इमारतीचे २५ लाखांचे भाडे थकले
By admin | Published: May 14, 2014 11:46 PM