विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कन्नड ते चाळीसगाव या मार्गावरील औट्रम घाटाचे मागील काही वर्षांपासून स्ट्रक्चर आॅडिट न केल्यामुळे तो घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्या घाटाच्या दुरुस्तीसाठी तातडीने २५ कोटींपर्यंतचे अंदाजपत्रक तयार करून ते नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्ली मुख्यालयाला पाठविण्याच्या सूचना प्रादेशिक अधिकारी चंद्रशेखर यांनी गुरुवारी केल्या. त्यांनी गुरुवारी घाटाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.लोकमतने २३ आॅगस्टच्या अंकात घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याचे व बोगद्याचे काम होईपर्यंत घाटाची वाहतुकीला गरज असल्याचे वृत्त प्रकाशित करून नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. त्या वृत्तानंतर दोन दिवसांतच नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख चंद्रशेखर यांनी घाट पाहणी केली. त्यांच्यासोबत प्रकल्प अधिकारी वाय. एन. घोटकर आदींची उपस्थिती होती.औट्रम घाटात बोगद्याचे काम होण्यासाठी आजपासून किमान ५ वर्षांचा कालावधी नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) गृहीत धरला आहे. २०२४ पर्यंत तो घाट वाहतुकीसाठी लागणार आहे. ५ वर्षांसाठी घाट सुरळीत ठेवायचा असेल, तर त्यावरील भविष्यातील वाहतुकीच्या अनुषंगाने तेथील सुरक्षा किंवा पर्यायी मार्गाची गरज आहे. बोगद्याचे काम होणार म्हणून घाटाकडे दुर्लक्ष केले होते. लोकमतच्या वृत्तानंतर २५ कोटींचे अंदाजपत्रक घाट दुरुस्ती करण्याचे ठरले आहे.नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे २०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे ते औरंगाबाद ते येडशी हा मार्ग हस्तांतरित झाला. त्यामध्ये औट्रम घाटाचा समावेश होता. मागील ६ वर्षांत या घाटाचे स्ट्रक्चर आॅडिट किंवा सुरक्षेच्या अनुषंगाने पाहणी झाली नव्हती.
औट्रम घाटाची दुरुस्ती; २५ कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:47 AM