वाळूज महानगर : वाळूज येथील दत्त कॉलनीतील सेप्टिक टँकची ग्रामपंचायतीने दुरुस्ती केली आहे. या वसाहतीतील ड्रेनेजलाइनचे सेप्टिक चेंबर आठवडाभरापूर्वी लिकेज झाल्याने सांडपाणी वसाहतीतील उघड्या भूखंडावर साचत होते. या सांडपाण्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने या सेप्टिक टँकची साफसफाई करून दुरुस्ती केली आहे.
-------------------------
बजाजनगरात मोकाट जनावरांचा उपद्रव
वाळूज महानगर : बजाजनगरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या कामगार वसाहतीत मोरे चौक, लोकमान्य चौक, मोहटादेवी चौक, सिडको उद्यान रोड, गणपती मंदिर, जयभवानी चौक, एफ. डी. सी. चौक आदी ठिकाणी मोकाट जनावरांचे कळप फिरताना दिसून येतात. ही मोकाट जनावरे रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
----------------------
कोलगेट चौकात सांडपाणी
वाळूज महानगर : पंढरपूर-रांजणगाव मार्गावरील कोलगेट चौकात सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले आहेत. या सांडपाण्याचे लोंढे दूरपर्यंत पोहोचले असून, ठीकठिकाणी त्याचे तळे साचले आहे. मुख्य रस्त्यावरच साचलेल्या पाण्यातून जातांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
------------------------------
शिवाजीनगरात घंटागाडीची वेळ बदला
वाळूज महानगर : वाळूजच्या शिवाजीनगरात घंटागाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. या परिसरात दररोज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घंटागाडी केरकचरा गोळा करीत फिरत असते. मात्र, भल्या सकाळीच घंटागाडी येत असल्याने महिलांची कचरा टाकण्यासाठी धांदल उडत आहे. या भागातील घंटागाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
--------------------------------
रांजणगावात लॉकडाऊनमुळे शुकशुकाट
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे लॉकडाऊनची पोलीस प्रशासनाकडून सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. या अंमलबजावणीमुळे गावातील मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊनविषयी परिसरात जनजागृती करण्यात आल्याने बाजारपेठा व छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत.
-----------------------------