गारखेडा परिसरातील जलकुंभावरुन गजानन महाराज मंदिर परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी ३०० मि.मी. व्यासाची ही जलवाहिनी टाकलेली आहे. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास परिसरातील भागाला पाणीपुरवठा सुरू होता. त्याचवेळी अचानक गजानन मंदिराच्या पाठीमागे जलवाहिनी फुटली. सर्व पाणी रस्त्यावरुन वाहू लागले. फूल विक्रेत्यांच्या दुकानांजवळ पाणीच पाणी झाल्याने त्यांचीही तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी झाल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. माहिती मिळताच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाहिनीवरील पाणीपुरवठा बंद केला. बुधवारी सकाळी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. काही वेळातच हे काम पूर्ण होताच या वाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.
--------------------
भारत बटालियनतर्फे मनपा कर्मचाऱ्यांचा गौरव
औरंगाबाद : महाालिका हद्दीतील सातारा परिसरातील भारत राज्य राखीव पोलीस बटालियनचे जवान लॉकडाऊनकाळात शहरात व मालेगावात तैनात होते. मालेगावात गेलेल्या ९७ जवानांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्व जवानांना पालिकेच्या एमआयटी कोविड सेंटर येथे दर्जेदार उपचार केले होते. या ठिकाणी पालिकेने वेळोवेळी जंतूनाशक औषध फवारणी, जवानांना जेवण व इतर अत्यावश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. या अनुषंगाने पालिका कर्मचाऱ्यांनी चांगली आरोग्यसेवा दिल्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून मंगळवारी बटालियनचे समादेशक जी. एस. निजलेवार यांच्या हस्ते पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब उनवणे, पर्यवेक्षक शेख अन्वर शेख, के. जी. दौड, बोराडे, एमपीडब्ल्यूचे सुनील सोळुंके, संतराम साने, भारत बोचरे व एमआयटी कोविड सेंटरचे डॉक्टर तसेच नर्सेस व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
-------------------