औरंगाबाद : दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत अलोट गर्दी केली आहे. यामध्ये अनेक नागरिक मास्क न घालता फिरत आहेत. एक कोरोना वाहक रुग्ण बाजारात फिरला तर शेकडो नागरिकांना बाधित करू शकतो. बाजारातील गर्दीचे परिणाम १५ दिवसांनंतर दिसतील, असा अंदाज महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला. त्यामुळे सर्व कोरोना उपचार केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.
बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी करू नका, असे वारंवार सांगितल्यानंतरही नागरिकांनी तेच केले. गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट, शाहगंज, टीव्ही सेंटर, कॅनॉट मार्केट आदी ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीत असंख्य नागरिक विनामास्क असतात. विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेने १५ पथके नेमली आहेत. दुकानात गर्दी पाहून पथकाकडून व्यापाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. गर्दीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर बुधवारी वारंवार ट्रॅफिक जाम होत होती.
एक रुग्ण फिरला तर...
गर्दीत एक जरी कोरोना रुग्ण फिरला तर तो किमान ४०० नागरिकांना धोका निर्माण करू शकतो. मागील आठ ते दहा दिवसांपासून परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. त्याचे परिणाम किमान १५ दिवसांनंतर दिसून येतील, असा अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तविला आहे. नोव्हेंबर अखेरीस आढावा घेऊन काही कोरोना उपचार केंद्रे बंद करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला होता. मात्र, दिवाळीच्या परिस्थितीमुळे एकही केंद्र बंद न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहरात सध्या ७०० सक्रिय रुग्ण आहेत.
दिल्लीमध्ये अचानक रुग्ण वाढले
दिल्लीत थंडी वाढली आहे. त्यासोबतच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हिवाळ्यात औरंगाबाद शहरातही रुग्ण वाढू शकतात असा अंदाज आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. शहरात आजही दररोज पाचशे ते सहाशे संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.